Join us  

२० लाख करोड पॅकेजबाबत उद्योजकांमध्ये नाराजी, युवक काँग्रेसचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 5:29 PM

छोटे व्यापारी व उद्योजकांना काहीच मिळाले नसल्याने पॅकेजची घोषणा ही पोकळ होती हे स्पष्ट झाले आहे. 

मुंबई - महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून 'कहां गये वो 20 लाख करोड?' हे राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी लघु व मध्यम उद्योगक्षेत्रातील व्यावसायिकांशी संवाद साधत 20 लाख कोटींच्या पॅकेजमधून काही लाभ मिळतोय का? याची माहिती घेतली. यातून छोटे व्यापारी व उद्योजकांना काहीच मिळाले नसल्याने पॅकेजची घोषणा ही पोकळ होती हे स्पष्ट झाले आहे. 

या राज्यव्यापी आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन छोटे व्यापारी व उद्योजकांशी संवाद साधला. जीएसटीमध्ये सूट न मिळाल्यामुळे व्यापारी वर्ग नाराज आहे. कर संकलन पूर्वीसारखेच आहे. जे 20 लाख करोडमध्ये कर्ज आहे तेदेखील व्याजासकट परत करायचे आहे ते व्याजासकट वसूल केले जाणार आहे. यात मदत अशी काहीच नाही. कुठल्याही व्यापाऱ्याला कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मोदी सरकार आल्यापासून अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. मोदी फक्त घोषणा करतात, मोठमोठे आकडे बोलतात. पण प्रत्यक्षात काही मिळाले असे आजवर कधीच झाले नाही, असा उद्योजकांचा एकूण सूर  होता.

यावेळी युवक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन करून आणि पत्र लिहून उद्योजकांच्या मागण्या समोर ठेवल्या आहेत. दर दिवशी एका घटकाला भेटून त्यांच्या मागण्या सरकारसमोर ठेवण्यात येतआहेत. पुढील 2 दिवसांत नोकरदारांच्या काय अडचणी आहेत? बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली? याची शहानिशा करून युवक काँग्रेस मोदी सरकारच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करणार आहे.

लघु व मध्यम उद्योगक्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारने आर्थिक मदत व जीएसटीमध्ये सवलत देणे गरजेचे होते. तीसुद्धा दिली नाही. शेवटी शेतकऱ्यांप्रमाणेच लघु व मध्यम उद्योजकांच्या तोंडास पाने पुसण्यात आली आहेत. २० कोटींचे पॅकेज हासुद्धा जुमलाच होता हे आता सिद्ध झाले आहे, असे यावेळी सत्यजीत तांबे म्हणाले.

टॅग्स :सत्यजित तांबे