Join us

शक्तिप्रदर्शनासह दिग्गजांचे अर्ज दाखल

By admin | Updated: September 27, 2014 06:22 IST

शहरासह उपनगरांतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस उरलेला असताना दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत

मुंबई : शहरासह उपनगरांतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस उरलेला असताना दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांमध्ये वरळीतून सचिन अहिर, बोरीवलीतून विनोद तावडे, अंधेरी पूर्वमधून सुरेश शेट्टी, विक्रोळीतून मंगेश सांगळे, चेंबूरमधून चंद्रकांत हंडोरे, भायखळ्यातून मधुकर चव्हाण यांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसमोर जुने मित्र उभे राहणार असल्याने या उमेदवारांची धाकधूक स्पष्टपणे दिसून आली. मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघांतून एकूण ४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर उपनगरातून २६ मतदारसंघांतून १२४ अर्ज दाखल झाले आहेत. वरळी मतदारसंघातून शुक्रवारी राष्ट्रवादीचे आ. सचिन अहिर, शिवसेनेच्या सुुनील शिंदे यांनी मिरवणुकीने अर्ज भरीत शक्तिप्रदर्शन केले. थोड्याफार फरकाने दोन्ही उमेदवार निवडणूक कार्यालयात एकाच वेळी पोहोचल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. मलबार हिल मतदारसंघामध्ये कॉँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड. सुशीबेन शहा यांनी अर्ज भरला असून भाजपाचे मंगलप्रभात लोढा यांच्यासमोर त्यांनी आव्हान उभे केले आहे.