Join us  

कुशल रोजगारक्षम निर्मितीत अभियांत्रिकी क्षेत्रच अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 6:26 AM

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या काही शाखांतील कमी झालेली मनुष्यबळाची मागणी यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे.

 - सीमा महांगडे मुंबई : गरजेपेक्षा जास्त अभियांत्रिकी महाविद्यालयांना दिलेली परवानगी आणि त्याचवेळी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या काही शाखांतील कमी झालेली मनुष्यबळाची मागणी यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे. परिणामी राज्यात आणि देशात दरवर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या हजारो जागा रिक्त राहत आहेत. असे असली तरी २०१९ च्या इंडिया स्किल्सच्या अहवालानुसार प्रत्यक्षात अभियांत्रिकी क्षेत्रातून कुशल रोजगारक्षमता निर्मिती होत असल्याचे समोर आले आहे.२०१९ च्या इंडिया स्किल्सच्या अहवालानुसार अभियांत्रिकी क्षेत्रातून देशात सर्वाधिक म्हणजेच ५७.०९ टक्के रोजगारक्षम प्रतिभेची निर्मिती होते. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या हजारो जागा रिक्त राहत असल्या तरी देशाची बांधणी आणि विकासात सर्वात महत्त्वाचा वाटा आजही अभियांत्रिकी क्षेत्र व त्यातून घडणाऱ्या अभियंत्यांचाच आहे, हे यातून सिद्ध झाले आहे.स्किल्स इंडिया अहवालानुसार २०१४ ते २०१९ या ५ वर्षांत कुशल रोजगारक्षम मनुष्यबळाचे अभियांत्रिकी क्षेत्र इतर अभ्यासक्रमांपेक्षा नेहमीच पुढे राहिले. २०१९ च्या आकडेवारीप्रमाणे अभियांत्रिकी व त्यानंतर कुशल रोजगारक्षम निर्मितीसाठी बीएस्सी आणि एमसीए या अभ्यासक्रमांचा नंबर लागत असून त्यातून अनुक्रमे ४७.३७ टक्के व ४३.१९ टक्के रोजगाराची निर्मिती होते. त्याखालोखाल एमबीए, बी.फार्मा, बी.कॉम, बीए, पॉलिटेक्निक या अभ्यासक्रमांचा नंबर लागतो. २०१४ साली अभियांत्रिकी क्षेत्रातून झालेल्या कुशल रोजगारक्षम निर्मितीची टक्केवारी ५१.७४ एवढी होती. २०१५ मध्ये ती ५४ टक्के तर २०१६ आणि १७ मध्ये अनुक्रमे ५२.५८ आणि ५०.६९ टक्के इतकी होती. २०१८ साली ती पुन्हा ५१.५२ टक्के झाली तर २०१९ साली त्यात वाढ होऊन ती ५७.०९ टक्के झाली.स्किल्स इंडिया अहवालानुसार अभियांत्रिकी क्षेत्रातून सर्वाधिक उमेदवारांची प्रत्यक्ष नोकरीसाठी निवड झाली आहे. याची टक्केवारी २०१९ साली २३ टक्के असून मागील वर्षापेक्षा त्यात एका टक्क्याने वाढ झाली आहे. २०१५ साली ही टक्केवारी पाच वर्षांतील सर्वाधिक म्हणजे २९ टक्के एवढी होती. अभियांत्रिकीनंतर प्रत्यक्ष नोकरीसाठी सर्वात जास्त उमेदवार हे बीसीए, बीबीए, बी.कॉम, बीएसस्सी या क्षेत्रातून निवडले गेले आहेत. त्यानंतर एमबीए व आयटीआय क्षेत्रांतून सर्वाधिक उमेदवारांची निवड झाल्याचे अहवालात नमूद आहे.>देशाच्या विकासासाठी महत्त्वाचेअभियांत्रिकीच्या पारंपरिक अभ्यासक्रमापेक्षा मेकॅनिकल इंजिनीअरिंग, एरोनॉटिकल व एरोस्पेस इंजिनीअरिंग, मरिन इंजिनीअरिंग, एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग या शाखांना विद्यार्थी विशेष पसंती देत आहेत. याचाच अर्थ अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागा शिल्लक राहिल्या तरी अद्याप अभियंते आणि अभियांत्रिकी हे देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे क्षेत्र म्हणून गणले जात आहे. बदलत्या काळानुसार त्यामध्ये आवश्यक बदल आणि सुधारणा शिक्षणतज्ज्ञांना अपेक्षित आहेत.>सकारात्मक चित्र...अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमामध्ये जागा रिक्त राहण्याचे प्रमाण यंदा ५७ टक्क्यांवरून ४७ टक्क्यांवर आले आहे. याचाच अर्थ आजही अभियांत्रिकी क्षेत्राकडील विद्यार्थ्यांचा कल कायम असून राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी हे सकारात्मक चित्र आहे.- अभय वाघसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य