Join us
Daily Top 2Weekly Top 5

डीनच्या कामावर इंजिनीअर ठेवणार ‘नजर’; BMCने रुग्णालयांत नेमले चार कार्यकारी प्रशासक

By संतोष आंधळे | Updated: May 30, 2024 10:26 IST

सायन, केईएम, कूपर आणि नायर या मुंबई महापालिकेशी संलग्न असलेल्या चार रुग्णालयांशी संबंधित महाविद्यालयांत आता कार्यकारी प्रशासक नेमण्यात आले आहेत.

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सायन, केईएम, कूपर आणि नायर या मुंबई महापालिकेशी संलग्न असलेल्या चार रुग्णालयांशी संबंधित महाविद्यालयांत आता कार्यकारी प्रशासक नेमण्यात आले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही नियुक्ती केली असून, प्रशासक कार्यकारी अभियंता पदावरील अधिकारी आहेत. रुग्णालय अधिष्ठात्यांच्या (डीन) मदतीसाठी ही नेमणूक करण्यात आली असली, तरी रुग्णालयांतील कामकाजावर नजर ठेवण्यासाठी ही नेमणूक करण्यात आल्याची जोरदार चर्चा वैद्यकीय वर्तुळात आहे. वरील चारही रुग्णालयांमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपचार घेण्यासाठी रुग्ण येत असतात. त्यासाठी विविध तज्ज्ञ डॉक्टर आणि परिचारिकांची नेमणूक याठिकाणी केलेली असते. असे असले तरी कार्यकारी प्रशासक का? असा प्रश्न विचारला जात आहे.

निर्णय का?

रुग्णालयांमार्फत नियमितपणे रुग्णसेवा आणि रुग्णालय व्यवस्थापनासंदर्भात विविध प्रस्ताव महापालिकेसाठी तयार करण्यात येतात. त्यात मुख्यत्वे औषध आणि उपकरण खरेदी प्रस्ताव, काही ठिकणी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे प्रस्ताव असतात. हे प्रस्ताव परिपूर्ण आणि अचूकपणे मुख्यालयाकडे यावेत, जेणेकरून त्यावर तत्काळ निर्णय घेणे सोपे होईल आणि वेळ वाचेल. या सर्व प्रस्तावांची पाहणी करण्याची जबाबदारी कार्यकारी प्रशासकांची असेल. 

आक्षेप का?

रुग्णालयांत अधिष्ठाता हे रुग्णालय प्रमुख असतात. त्यांच्या मदतीला काही ठिकाणी अधिकाऱ्यांची फौज रुग्णालय व्यवस्थापनात असते. रुग्णसेवा  आणि विद्यार्थ्यांसाठी अध्यापक मंडळीही कार्यरत असतात. त्यासोबत निवासी डॉक्टर्स आणि इंटर्न्स मोठ्या प्रमाणात रुग्णांना सेवा देत असतात. वरील चारही रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात प्रशासकीय काम करण्यासाठी मनुष्यबळ असताना कार्यकारी प्रशासकीय अधिकाऱ्याची गरज आहे का? असा प्रश्न आहे. त्यापेक्षा १६ उपनगरीय रुग्णालयांत अनेक ठिकाणी वैद्यकीय अधीक्षकांची पदे रिक्त आहेत. त्या ठिकाणची पदे भरण्याची गरज असल्याचेही एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले.

चारही रुग्णालयांतील  प्रशासक अधिष्ठात्यांच्या वर नाही त्यांच्या हाताखाली काम करत आहेत. अधिष्ठात्यांच्या कामाचा ताण हलका व्हावा, याकरिता त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना प्रशासकीय कामात मदत व्हावी आणि अधिष्ठात्यांना रुग्णालयीन कामकाजात अधिक वेळ देता यावा, यासाठी ती केलेली व्यवस्था आहे. यामध्ये कुठेही त्यांच्या कामावर नजर ठेवण्याचा प्रश्न नाही. ‘एम्स’सारख्या राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य संस्थेतही अशा पद्धतीचे प्रशासक असतात. काही ठिकणी तर सनदी अधिकारी असतात.- डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त महापालिका आयुक्त, आरोग्य

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबईहॉस्पिटलसायन हॉस्पिटल