अलिबाग : पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता रंगारीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली. रंगारीला आता अजून १० नोव्हेंबरपर्यंत पोलिसांचा पाहुणचार घ्यावा लागणार आहे. पेण तहसीलदार कार्यालयातील लिपिक अमर ठमके आणि अलिबाग-वायशेतचा तलाठी जनार्दन हाले यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचा जामीन मंजूर झाला असून त्यांना सोमवारी आणि शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजेरी लावावी लागणार असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील यांनी दिली.तीनही आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पनवेलचा कार्यकारी अभियंता रंगारी याला बिले मंजूर करण्यासाठी ७३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते, तर पेण तहसीलदार कार्यालयातील अमर ठमके आणि अलिबाग-वायशेतचा तलाठी यांना सातबाराच्या नोंदी करिता लाच स्वीकारताना पकडले होते. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर ठमके आणि हाले यांनी जामीन मिळण्यासाठी स्वतंत्र अर्ज केले. ते न्यायालयाने सशर्त मान्य केले.रंगारी यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडले होते. त्यामुळे त्याची अजून चौकशी करणे गरजेचे असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील कलगुटकर यांचे म्हणणे आहे.
अभियंता रंगारीच्या कोठडीत वाढ
By admin | Updated: November 6, 2014 22:56 IST