मुंबई : एका अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून खंडणीची मागणी करणाऱ्या एका इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरला मंगळवारी पोलिसांनी खोपोलीतून अटक केली. गुन्हे शाखा, कक्ष ११ ने ही कारवाई करत आरोपीला चारकोप पोलिसांच्या स्वाधीन केले.प्रथमेश प्रकाश साळुंखे (२०) असे आरोपीचे नाव आहे. तो रायगड जिल्ह्यातील खोपोलीचा रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून साळुंखेने चारकोप येथील अकरावीच्या विद्यार्थिनीशी ओळख केली. त्यानंतर या दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. मात्र ६ सप्टेंबर रोजी साळुंखेने या मुलीला आपल्या दोघांचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून सात हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे ही मुलगी घाबरली आणि तिने याबाबत तिच्या वडिलांना सांगितले. त्यानुसार त्यांनी तत्काळ चारकोप पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाइल क्रमांकावरून आरोपीचा खोपोलीतील पत्ता शोधला. (प्रतिनिधी)
खंडणी मागणाऱ्या इंजिनीअरला अटक
By admin | Updated: September 9, 2015 04:35 IST