आगरदांडा : मुरूड तालुक्यातील एकदरा गावातील बहुचर्चित असलेल्या वाळीत प्रकरणावर अखेरीस पडदा पडला आहे. श्रीरामनवमीचा उत्सव व स्रेहसंमेलनाचा कार्यक्रम एकत्रित येऊन वाळीत जगन वाघरे, पाटील, दामशेठ कुटुंबीयांनी व एकदरा कोळी समाजाने साजरा केला. रामनवमी उत्सव व पालखी सोहळा आणि दुसऱ्या दिवशीचा स्रेहसंमेलनाचा कार्यक्रम गेली कित्येक वर्षे एकदरा गाव वाळीत प्रकरणामुळे राज्यभर गाजत होता. या कार्यक्रमामुळे वाळीत प्रकरणावर पडदा पडल्याचे दिसून येत होते.श्रीरामनवमीच्या उत्सवात मंदिरात भजन, कीर्तन व जन्मोत्सव व सायंकाळी एकदरा ते मुरूड, मुरूड ते एकदरा अशी भव्य पालखी काढण्यात येते. हा उत्सव पाहण्यासाठी तालुक्यातून व शहरातून प्रचंड भाविकांची गर्दी होते. यावेळी श्रीरामनवमी उत्सवात बहुचर्चित एकदरा वाळीत प्रकरणामुळे कुठे गालबोट लागतो की काय, अशी चर्चा सर्वत्र होत होती. परंतु असे काही न होता एकदरा वाळीत प्रकरणातील जगन वाघरे, गणेश दामशेठ, नारायण वाघरे व रश्मीकांत पाटील यांच्यासह त्यांचे सर्व वाळीत कुटुंबीय व कोळी समाज साजरा करत असलेल्या श्री रामनवमी उत्सवात व भव्य पालखी मिरवणुकीत एकत्रितपणे सहभागी झालेले दिसले. दुसऱ्या दिवशी या उत्सवाची सांगता पारंपरिक पद्धतीने स्रेहसंमेलनाच्या कार्यक्रमाने झाली. (वार्ताहर)
वाळीत प्रकरणावर अखेर पडदा
By admin | Updated: April 1, 2015 22:18 IST