Join us

जून अखेरपासून राज्याला दर दिवसाला ९ लाख लसींचे डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:05 IST

एकूण पुरवठ्यापैकी १० टक्के लस मुंबईलामुंबई : केंद्र शासनासोबत लसीच्या पुरवठ्याविषयी घेण्यात आलेल्या बैठकीत संसर्ग नियंत्रणाच्या दृष्टीने सकारात्मक ...

एकूण पुरवठ्यापैकी १० टक्के लस मुंबईला

मुंबई : केंद्र शासनासोबत लसीच्या पुरवठ्याविषयी घेण्यात आलेल्या बैठकीत संसर्ग नियंत्रणाच्या दृष्टीने सकारात्मक बाब समोर आली आहे. त्यानुसार, जून अखेरपासून राज्याला दर दिवसाला नऊ लाख लसींचे डोस पुरविण्यात येणार आहेत. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसींचे उत्पादन वाढविण्यात आले आहे, शिवाय स्पुतनिक लसही वितरणासाठी उपलब्ध झाली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याला जून महिन्यात एकूण ७० लाख, तर जुलै महिन्यात एक कोटी लसींचे डोस मिळतील. लसींचा योग्य पुरवठा उपलब्ध झाल्यास दिवसाला १५ लाख जणांचे लसीकरणाचे लक्ष्य असल्याचे आराेग्य विभागाने नमूद केले. पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, राज्याला उपलब्ध होणाऱ्या लसींच्या एकूण पुरवठ्यापैकी १० टक्के लस मुंबईला मिळतील. गेल्या महिन्यात लसींचा साठा कमी मिळाला होता, त्यामुळे आता राज्याला अधिक लसींचा साठा देण्याची विनंती केली आहे.

मे महिन्यात केंद्राने राज्याला ४०.६ लाख लसींचे डोस पुरविले. तर २५.१ लाख लसींचे डोस राज्याने खरेदी केले. हे डोस १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी खरेदी केले होते, परंतु नंतर निर्णयात बदल करून ४५ हून अधिक वय असणाऱ्या लाभार्थ्यांना लस देण्यात आली. राज्यातील खासगी व्यवस्थापनांनी ३२.३८ लाख लसींचे डोस मे महिन्यात खरेदी केले आहेत.

* जागतिक निविदा काढून लस घेण्याचा निर्णय तूर्तास रद्द

संसर्ग होण्याच्या दृष्टिकोनातून ४५ हून अधिक वय असणारे हे अतिजोखमीच्या गटातील असल्याने त्यांना लसीचा पहिला डोस देण्यात येईल, त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील शासकीय-पालिका संस्थांमधील लसीकरण पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले. जागतिक निविदा काढून लस घेण्याचा निर्णय तूर्तास रद्द केला असून, सध्या केंद्र शासनाकडून लसींचा पुरवठा घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिली.

--------------------------