नामदेव मोरे, नवी मुंबईअतिक्रमण रोखण्याची जबाबदारी असलेल्या तुर्भे पोलिसांनीच सानपाडामधील बाबू गेनू सैद मैदानामध्ये अतिक्रमण केले आहे. पोलीस स्टेशनची इमारत, फायबरची चौकी उभी केली आहे. गुन्ह्यांमध्ये पकडून आणलेली वाहनेही मैदानामध्येच उभी केली जात असून त्याविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील अतिक्रमण रोखण्याची जबाबदारी महापालिका प्रशासन व पोलिसांची आहे. परंतु पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये पोलीस चौक्यांसाठीचे नियोजनच केले नसल्यामुळे काही चौक्या अनधिकृतपणे उभारण्यात आल्या आहेत. तुर्भे पोलीस स्टेशनची पूर्ण इमारतच अनधिकृतपणे बांधण्यात आली आहे. पूर्वी हे पोलीस स्टेशन ठाणे बेलापूर रोडवर शरयू हुंडाई कंपनीजवळ सुरू होते. परंतु त्या ठिकाणी आता एमआयडीसी पोलीस स्टेशन सुरू असून तुर्भे पोलीस स्टेशन सानपाडामधील हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानातील पोलीस चौकीत हलविण्यात आले आहे. या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची केबिन, ठाणे अंमलदार, स्टोअर रूम व कर्मचाऱ्यांसाठी जागा कमी असल्याने गतवर्षी दोन रूम वाढविण्यात आल्या आहेत. पोलीस स्टेशनच्या मागे मैदानामध्ये फायबरची चौकी उभी केली आहे. मैदानाच्या उर्वरित भागामध्ये विविध गुन्ह्यांमध्ये पकडून आणलेली वाहने उभी केली जात आहेत. सद्यस्थितीमध्ये टेंपो कारसह जवळपास दहा वाहने उभी आहेत. यामुळे क्रीडापे्रमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
पोलीस ठाण्याचे मैदानात अतिक्रमण
By admin | Updated: September 29, 2014 03:17 IST