मुंबई : केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत राज्यामधील २५४ शहरांतील वीज यंत्रणेचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणच्या वतीने गुरुवारी देण्यात आली.केंद्र सरकारच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत राज्याला सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्याद्वारे वीज वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण, वीजहानी आणि वाणिज्यिक हानी कमी करणे व शहरी भागासोबत ग्रामीण भागातील ग्राहकांना ३६५ दिवस वीज पुरवठा मिळावा यासाठी वीज यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.या योजनेत मुंबईतील बेस्टसह महावितरणच्या ४४ मंडल कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये या योजनेतील कामे होणार आहेत. शिवाय योजनेत ३३ केव्हीची १२८ नवीन उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत आणि ६० उपकेंद्रांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. सुमारे ३ हजार ७७८ किलोमीटरच्या उच्चदाब तर ३ हजार १५१ किलोमीटरच्या लघुदाब वाहिन्या उभारण्यात येणार आहेत. या सर्व भागात ६ हजार ६० नवीन वितरण रोहित्रे उभारण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
२५४ शहरांतील वीज यंत्रणेचे सक्षमीकरण
By admin | Updated: October 9, 2015 03:24 IST