Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी अन पगार कमी

By admin | Updated: March 21, 2015 22:48 IST

स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा, स्थलांतर थांबावे यासाठी शासनाने मोठा गाजावाजा करत म. ग्रा. रो. हमी योजना सुरू केली आहे.

मोखाडा : स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा, स्थलांतर थांबावे यासाठी शासनाने मोठा गाजावाजा करत म. ग्रा. रो. हमी योजना सुरू केली आहे. परंतु या योजनेचा मोखाडा तालुक्यात पुर्णपणे बोजवारा उडाला असून तालुक्यातील धामणशेत बेहटवाडी येथील कामावर काम करणाऱ्या काही मजुरांना संपुर्ण दिवसभराच्या कामाचा मोबदला म्हणून चक्क ११ रू. मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे. किमान वेतन न देणाऱ्या प्रशासनाकडे वेतन मागण्यासाठी श्रमजिवी संघटना २६ मार्चला तहसिल कार्यालयासमोर ठाण मांडुन बसणार असल्याचे निवेदन मोखाडा तहसिलदारांना दिले आहे. यामुळे रोजगार हमी आणि पगार कमी अशी परिस्थिती तालुक्यातील अनेक मजुरांवर आल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे.संपुर्ण तालुक्यात रोजगार हमीची कामे देण्यासाठी मागेल त्याला काम आणि १५ दिवसात दाम या पद्धतीची रोजगार हमी योजना कृषी ग्रामपंचायत तहसिलदार वनविभाग या खात्याकडून राबवण्यात येते मात्र धामणशेत ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या कामासाठी एकुण मजुरापैकी १० ते ११ मजुरांना संपुर्ण दिवसाचा म्हणून केवळ ११ रू. रोज मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रोजगार हमीच्या योजनेच्या किमान वेतनाप्रमाणे प्रती मजुराला १६८ रू. रोज मिळायला हवा असा नियम मात्र या ठिकाणी किमान वेतनाची संपूर्णपणे वाताहात लागली असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)४तालुक्यातील स्थलांतर थांबावे यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परंतु असे न होता कुठेतरी एखादे काम वगळता अनेकांच्या हाताला कामच मिळत नाही तसेच यंत्रणेही हाती घेतलेल्या कामाची मंजुरी क्षमताही कमी असल्याने कमी कामात अनेक मजुर रोजगार मिळावा या आशेने कामावर येतात.४यामुळे ठराविक रक्कमेतुन प्रशासनच सगळ्यांना वाटुन पैसे देत असल्याचा प्रकार घडत असल्यानेच मजुरांना अतिशय कमी पगार मिळत असल्याचे प्रकार घडत आहे. याबाबतीच्या सोडवणुकीसाठी श्रमजीवी संघटनेने मजुरांचे किमान वेतन घेण्यासाठी, तहसिल कार्यालयावर मोर्चा आयोजित केला आहे. मजुरांना किमान वेतन मिळेपर्यंत ठाण मांडून बसणार असल्याचे सदरच्या निवेदनात म्हटले आहे. रोजगार हमीच्या अंतर्गत मजुरांनी जेवढे काम केले असेल त्याचे मोजमाप घेऊनच त्या कामाचा मोबदला मजुरांना दिला जातो.- पी. बी. गोडाबे, गटविकास अधिकारी मोखाडा