Join us

दोन महिन्यांत ३३ हजार जणांना रोजगार, मंत्री नवाब मलिकांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:08 IST

मुंबई : कौशल्य विकास विभागाने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत राज्यभरात ३३ हजार ७९९ उमेदवारांना रोजगार मिळवून ...

मुंबई : कौशल्य विकास विभागाने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत राज्यभरात ३३ हजार ७९९ उमेदवारांना रोजगार मिळवून दिल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. महास्वयम वेबपोर्टल, ऑनलाइन रोजगार मेळावे अशा उपक्रमांतून इच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्थांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. मागील वर्षी या उपक्रमांतून १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून दिल्याचेही ते म्हणाले.

मंत्री मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपली माहिती भरतात. तर, कंपन्या येथे नोंदणी करून आवश्यकतेनुसार उमेदवारांचा शोध घेतात. याशिवाय, ऑनलाइन रोजगार मेळावेही घेतले जात आहेत. चालू वर्षात जानेवारी महिन्यात २० हजार ७१३ बेरोजगारांना तर फेब्रुवारी महिन्यात १३ हजार ८६ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला.

मंत्री मलिक म्हणाले की, फेब्रुवारीमध्ये विभागाकडे ३५ हजार ९१८ नोकरीइच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यात मुंबई विभागात १० हजार ४८१, नाशिक विभागात ४ हजार ७७३, पुणे विभागात ११ हजार १४२, औरंगाबाद विभागात ५ हजार ६९२, अमरावती विभागात १ हजार ३४६ तर नागपूर विभागात २ हजार ४८४ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १३ हजार ८६ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ६ हजार ८७८, नाशिक विभागात १ हजार ३५३, पुणे विभागात ३ हजार ८९३, औरंगाबाद विभागात ६९५, अमरावती विभागात १४५ तर नागपूर विभागात १२२ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले. यापुढील काळातही हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जाणार असल्याचे सांगतानाच इच्छुकांनी पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहनही मलिक यांनी केले.