Join us  

‘जेट’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अध्यक्षांचे पासपोर्ट जप्त करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 5:17 AM

विमानतळावर केले आंदोलन; देश सोडून जाऊ नये यासाठी काळजी घेण्याची व्यक्त केली गरज

मुंबई : जेट एअरवेजचा तिढा सुटण्याची काही चिन्हे दिसत नसल्याने जेटच्या कर्मचाऱ्यांमध्ये तणाव आहे. जेट एअरवेजमधील गुंतवणुकीबाबत बोली प्रक्रिया १० मे रोजी होणार असल्याने तोपर्यंत काही सकारात्मक घडण्याच्या आशेवर कर्मचारी होते. ही आशा आता हळूहळू संपुष्टात येऊ लागली आहे. जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल, त्यांच्या पत्नी, कंपनीतील वरिष्ठ पातळीवरील अधिकारी यांचे पासपोर्ट ताब्यात घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. पासपोर्ट जप्त केल्यावर त्यांना देशाबाहेर जाणे अशक्य होईल; त्यामुळे ही काळजी घ्यावी, अशी मागणी पुढे आली आहे.

जेट एअरवेजच्या रोजगार गमावलेल्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुंबई विमानतळाजवळ आंदोलन केले. ऑल इंडिया जेट एअरवेज ऑफिसर्स अ‍ॅण्ड स्टाफ असोसिएशनतर्फे हे आंदोलन करण्यात आले. कंपनीचे माजी अध्यक्ष गोयल, कंपनीचे संचालक, व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी यांचे पासपोर्ट जप्त केले नाही, तर ही मंडळी देश सोडून जातील व कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

पोलीस आयुक्तांची भेट, ग्रॅच्युएटी मिळेपर्यंत पासपोर्ट जप्त करण्याची मागणी करीत असोसिएशनचे अध्यक्ष आमदार किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना सुरक्षा सेवा पुरवणाºया जेटच्या कर्मचाºयांना दरमहा साडेसात कोटी वेतनासाठी मिळतात; मात्र ही रक्कमदेखील स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्याकडे घेते व कर्मचाऱ्यांना वेतन देत नाही, असा आरोप पावसकर यांनी केला.

‘वेतनाची रक्कम बँकेच्या ताब्यात’जेटच्या सुरक्षा विभागातील ३०० कर्मचारी या कामावर तैनात होते. त्यांना वेतनापोटी मिळालेली रक्कमदेखील स्टेट बँक ऑफ इंडियाने स्वत:च्या ताब्यात ठेवल्याचा आरोप असोसिएशनचे अध्यक्ष आमदार किरण पावसकर यांनी केला. पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. ग्रॅच्युएटीची रक्कम मोठी असल्याने ही रक्कम कर्मचाऱ्यांना मिळालीच पाहिजे. ही रक्कम मिळेपर्यंत जेटच्या वरिष्ठांचे पासपोर्ट जप्त करण्याची मागणी पावसकर यांनी केली. पीएफ व ग्रॅच्युएटी मिळण्यासाठी संंबंधित कार्यालयांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :जेट एअरवेजपासपोर्ट