Join us

सुविधांअभावी चिल्ड्रन्स होममधील कर्मचारी वैतागले

By admin | Updated: July 15, 2015 00:15 IST

सुविधांअभावी चिल्ड्रन्स होममधील कर्मचारी वैतागले

सुविधांअभावी चिल्ड्रन्स होममधील कर्मचारी वैतागले
कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

मुंबई: शासनाची मंजुरी असताना चिल्ड्रन्स होममधील कर्मचार्‍यांना निवृत्ती वेतन योजना, आरोग्य विमा योजना, रजा रोखीकरण आणि कालबद्ध पदोन्नीतीसारख्या योजनांचा लाभ मिळत नाही. यासाठी अनेकदा पत्रव्यवहार करुन देखील शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने येथील ३०० कर्मचारी सध्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
समाजातील अनाथ, मतीमंद आणि आई-वडिलांपासून दुरावेल्या मुलांसाठी मुंबई शहरात ८ निवासी बालसुधारगृह आहेत. या सुधारगृहामध्ये अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण ३०० कर्मचारी काम करतात. राज्य शासनाच्या अंतर्गत या बालसुधारगृहाचा कारभार चालतो. मात्र अनेक वर्षांपासून याठिकाणी काम करणारा कर्मचारी वर्ग शासनाच्या सर्व साधारण सेवांपासून वंचित आहे. येथील सर्व पदांना शासनाची मंजुरी असताना तसेच शासनाची वेतनश्रेणी लागून असताना या कर्मचार्‍यांना अद्यापही या सुविधांचा लाभ मिळालेला नाही. यासाठी गेली अनेक वर्ष या कर्मचार्‍यांचा शासनाशी लढा सुरु आहे. मात्र शासनाकडून आत्तापर्यंत त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांनी आंदोलानाचे हत्यार उपासण्याचा निर्धार केला आहे.
सध्या मुंबईतील सर्व बालसुधारगृहात सोमवारपासून मागणी सप्ताह सुरु करण्यात आला आहे. यामध्ये या कर्मचार्‍यांनी त्यांच्या मागणीचे पोस्टर तयार केले आहे. हे पोस्टर घालूनच सध्या कर्मचारी कामावर येत आहेत. शासनाने आमच्या या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या कर्मचार्‍यांकडून देण्यात आला आहे. शासनाने तत्काळ मागण्या मान्य कराव्यात, असा इशारा दी चिल्ड्रन्स एड सोसायटी एम्पॉईज युनियनकडून देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
..............................................
(चौकट)
काय आहेत मागण्या....
-राज्य शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे भविष्य निर्वाह निधीयोजना व कुटुुंब निवृत्ती वेतन योजना लागू करावी
-कालबध्द पदोन्नती लागू करण्यात यावी. अंतर्गत पदोन्नतीचा लाभ तत्काळ द्यावा
-कर्मचार्‍यांना मासिक वेतन महासेवार्थ प्रणालीद्वारे अदा करण्यात यावे
-रिक्त पदावर तत्काळ भरती करण्यात यावी
-संस्थाच्या भुखंडावर कर्मचारी गृहनिर्माण संस्था उभारण्यास मान्यता मिळावी
-येथील कर्मचार्‍यांना राज्य शासन कर्मचार्‍यांचा दर्जा देत सेवा सवलती लागू करण्यात याव्या
-कर्मचार्‍यांना रजा रोखीकरणाचा लाभ तत्काळ मिळावा
..............................................