Join us
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांनो, संपावर जाल तर खबरदार!

By admin | Updated: October 24, 2015 03:50 IST

दिवाळीचा बोनस दिला नाही, तर २५ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संपावर जाऊ, असा इशारा बेस्ट संघटनांनी दिला आहे. आता बेस्ट प्रशासनानेही याविरोधात कायदेशीर हत्या

मुंबई : दिवाळीचा बोनस दिला नाही, तर २५ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संपावर जाऊ, असा इशारा बेस्ट संघटनांनी दिला आहे. आता बेस्ट प्रशासनानेही याविरोधात कायदेशीर हत्यार उपसले आहे. संप करणे हे बेकायदेशीर असल्याचे म्हणत प्रशासनाने कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई केली आहे.प्रशासनाने आर्थिक कारण पुढे करीत मागील तीन वर्षांपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिलेला नाही. या वर्षी प्रशासनाने तोच कित्ता गिरवला आहे. बोनसपोटी ४७ कोटी रुपये खर्च करावे लागतात. बेस्टवर १६० कोटींचे कर्ज आहे. कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन द्यावे लागत आहे. महापालिकेकडून घेतलेले १ हजार ६०० कोटींचे कर्ज डोक्यावर आहे, अशी अनेक कारणे प्रशासनाने पुढे केली आहेत. यावर संतापलेल्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी प्रशासनाला संपाचा इशारा दिला आहे. बेस्टसेवा अत्यावश्यक आहे. त्यामुळे बेकायदेशीर ठरणारा संप पुकारणे, त्याला चिथावणी देणे, त्यात भाग घेणे आणि त्यासाठी इतर व्यक्तींना उद्युक्त करणे अशा घटनांबाबत कारवाईची तरतूद कायद्यात आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे. प्रशासनाने संपाविरोधात कायदेशीर मार्गाने हत्यार उपसल्याने संघटना आता नेमक्या काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)