Join us

सिडको वसाहतीत कचर्‍याचे साम्राज्य

By admin | Updated: May 15, 2014 00:14 IST

घंटागाडी कर्मचार्‍यांचे आंदोलन आणि सिडकोच्या आडमुठ्या धोरणांमुळे नवी मुंबईमधील सिडको वसाहतीतील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई : घंटागाडी कर्मचार्‍यांचे आंदोलन आणि सिडकोच्या आडमुठ्या धोरणांमुळे नवी मुंबईमधील सिडको वसाहतीतील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मागील पाच महिन्यापासून घंटागाडी कामगारांची आंदोलनाची ही पाचवी वेळ असून घंटागाडी चालक व क्लिनर यांना समान दर्जा दिला असल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन छेडण्यात आले होते. यामुळे सिडकोच्या अनेक वसाहतीत कचर्‍याचा खच पडला होता. सिडकोमार्फत बीवीजी (भारत विकास ग्रुप) या कंपनीला कचरा उचलण्याचा ठेका देण्यात आला आहे. या ठेकेदार कंपनीवर २४ कर्मचारी काम करीत असून त्यापैकी ९ चालक , १५ क्लिनर म्हणून काम करतात. घंटागाडी चालकांचे वेतन कमी करून ते क्लिनर एवढे केल्यामुळे समान काम समान वेतन या तत्त्वावर सिडकोने दोघांना एकाच श्रेणीत आणल्याने हा वाद उफाळला. मात्र या वादाचा फटका सर्वसामान्यांना बसत असून सिडको वसाहतीतील आरोग्य अधिकार्‍यांना देखील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यावर एकदाच तोडगा काढा अशी संतप्त प्रतिक्रि या सिडकोचे अधिकारी खाजगीत देत असतात. यावर बीवीजी कंपनी देखील सिडको प्रशासनाचा हा मुद्दा असून आमचा याच्याशी संबंध नसल्याचे सांगतात. खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, कामोठे, खांदा वसाहत मधील नागरिकांना घंटागाडी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचा फटका बसतो व शहरामधील कचर्‍याच्या ढिगामुळे दुर्गंधीला सामोरे जावे लागत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्वरित तोडगा काढण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे. (प्रतिनिधी)