Join us  

कोरोनामुळे आणीबाणीची परिस्थिती; 'या' देशात २ नोव्हेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 5:01 PM

दुस-या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली.

मुंबई : दुस-या लाटेत जर्मनीतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून तो दर कमी झाला नाही तर आरोग्य व्यवस्था कोलमडून पडेल अशी भीती खुद्द देशाच्या पंतप्रधान अँजले मार्केल यांनी व्यक्त केली आहे. ही आणीबाणी टाळण्यासाठी देशात २ नोव्हेंबरपासून पुन्हा लाँकडाऊन लागू करण्याची घोषणा झाली आहे. रुग्णसंख्येनुसार शहरांचे हिरवा, पिवळा आणि लाल असे झोन तयार केले जात असून त्यानुसार निर्बंध लादले जात असल्याची माहिती जर्मनीत स्थायिक असलेल्या अमित गोरे यांनी दिली.

मे महिन्यांत एका दिवशी आढळलेले ६ हजार रुग्ण आणि ३५० मृत्यू हा जर्मनीचा उच्चांक होता. मात्र, आता रुग्णसंख्या उसळी घेत असून दोन दिवसांपूर्वी तो आकडा १४ हजारांवर गेला होता. युरोपातील कोरोनाच्या पहिल्या कोरोना लाटेत इटली आणि ब्रिटनमधिल मृत्यू दर अनुक्रमे ९ आणि ४.२ टक्के असताना जर्मनीने कठोर उपाय योजनांमुळे तो दर ०.३ टक्क्यांवरच रोखून ठेवला होता. दुस-या लाटेतही मृत्यूचे प्रमाण आणखी घटले असून ती दिलासादायक बाब आहे. मात्र, गेल्या १० दिवसांत आयसीयूमध्ये उपचार घेणा-या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. सध्या ३३ टक्के बेड रिक्त असले तरी वाढत्या संक्रमणाचा वेग पाहता ते सुध्दा अपूरे पडण्याची भीती सरकारने व्यक्त केली आहे. ७५ टक्के रुग्णांच्या संसर्गाचे मुळ शोधणे सरकारला अशक्य झाले आहे. आँगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतील सहली या वाढत्या संक्रमणास कारणीभूत असल्याचीही चर्चा देशात हे. डिसेंबर महिन्यांतील ख्रिसमस सेलीब्रेशन करायचे असेल तर पुढील एक दीड महिना निर्बंधांसह दैनंदिन जीवन जगण्याशिवाय पर्याय नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

लाँकडाऊनचे नियम  

बार, रेस्ट्राँरण्ट, स्विमिंग पूल, मनोरंजनाची ठिकाणे, अनावश्यक प्रवास, स्पोर्टस इव्हेंट, सार्वजनिक कार्यक्रम, पर्यटकांचा हाँटेलांमधिल मुक्काम या सर्वांवर बंदी घालण्यात आली आहे. प्रार्थनास्थळे, शाळा आणि छोट्या मुलांसाठी बगीचे सुरू ठेवले जातील. शक्य असेल तर घरूनच काम करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दहा पेक्षा जास्त लोकांना घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे.  

निम्म्या जनतेचा निर्बंधांना विरोध

देशातील निम्म्या जनतेचा या निर्बंधांना विरोधात असल्याची माहिती एका सर्वेक्षण अहवालातून समोर आली आहे. कोरनापासून संरक्षण ही आता वैयक्तिक जबाबदारी आहे. सरकारने निर्बंध लादू नये असे त्यांचे म्हणणे आहे. या निर्बंधानंतरही थंडीची लाटेत कोरोनाच्या प्रसाराला ब्रेक लागेल याची शाश्वती देता येत नाही.

एक लाख कोटींचे अर्थसहाय्य

जर्मनीची अर्थव्यवस्था तगडी असली तरी नव्या निर्बंधांमुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. त्यांना सहाय्य करण्यासाठी जर्मन सरकारने ११.८ दशलक्ष युरोंचे (सुमारे एक लाख कोटी रुपये) नवे पँकेजही जाहीर केले आहे. अत्यंत नगण्य व्याजदरात हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.   

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याजर्मनी