Join us

अग्निशमन दलामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता

By admin | Updated: May 12, 2015 03:28 IST

महापालिका अग्निशमन दलामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यांच्यावरील ताण वाढत असून अपुऱ्या सुविधा मिळत असल्याने शिवसेनेने नाराजी

नवी मुंबई : महापालिका अग्निशमन दलामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यांच्यावरील ताण वाढत असून अपुऱ्या सुविधा मिळत असल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. वाशीतील अग्निशमन केंद्राच्या जागेवर बहुउद्देशीय इमारत बांधण्यात येत असून त्यालाही विरोध करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील काळबादेवीमध्ये झालेल्या दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांनी ऐरोली व वाशीमधील अग्निशमन केंद्रांना भेट दिली. तेथील कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. ऐरोलीमध्ये काही कर्मचाऱ्यांचे बूटही फाटलेले असल्याचे निदर्शनास आले. आग विझविण्यासाठीचा फायरप्रूफ सुटही एकच असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. वाशीमधील मुख्य अग्निशमन केंद्राची इमारत मोडकळीस आली असून त्याठिकाणी बहुउद्देशीय इमारत बांधण्यात येत आहे. याविषयी चौगुले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील लोकसंख्या वाढत आहेत. नवीन इमारती तयार होत आहेत. अग्निशमन केंद्राची जागा त्याच कारणासाठी वापरली पाहिजे. बहुउद्देशीय वापराच्या निर्णयाला आमचा विरोध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये ६३५ कर्मचारी व अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये फक्त १४० कर्मचारी आहेत. ४९५ नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. परंतु त्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही. उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याचेही यावेळी सांगितले. अग्निशमन दलातील गैरसोयींविरोधात आवाज उठविणार असल्याचे चौगुले यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. कोणत्याही स्थितीमध्ये अग्निशमन दलाच्या जागेचा दुसऱ्या कामांसाठी वापर होऊ दिला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.