Join us  

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी - मृतांमध्ये फोटो असलेला तरुण जिवंत असल्याचं उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2017 1:39 PM

एलफिन्स्टन दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 35 वर्षीय तरुण इमरान शेखरचंही नाव होतं. मात्र मृत्यूमुखी म्हणून पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेला इमरान शेख जिवंत असल्याचं समोर आलं आहे.

ठळक मुद्देएलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झालादुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 35 वर्षीय तरुण इमरान शेखरचंही नाव होतंमृत्यूमुखी म्हणून पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेला इमरान शेख जिवंत असल्याचं समोर आलं आहेगैरसमज झाल्यामुळे इमरान शेख यांचं नाव मृतांच्या यादीत गेलं होतं

मुंबई - एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 35 वर्षीय तरुण इमरान शेखरचंही नाव होतं. मात्र मृत्यूमुखी म्हणून पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेला इमरान शेख जिवंत असल्याचं समोर आलं आहे. परळ - एलफिन्स्टन रेल्वे ब्रिजवर झालेल्या दुर्घटनेनंतर इमरान शेख आपले मित्र आणि नातेवाइकांना फोन करुन आपण जिवंत असल्याचं सांगत आहे. गैरसमज झाल्यामुळे इमरान शेख यांचं नाव मृतांच्या यादीत गेलं होतं. 

आधी प्रसारमाध्यमांकडून इमरान शेख यांचं नाव मृतांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं होतं, आणि आता तर एलफिन्स्टन स्थानकाबाहेर मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर इमरान शेख यांचा फोटो आणि नाव देण्यात आलं आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दादरमध्ये काम करणा-या कपडा व्यापारी इमरान शेख याने सांगितलं आहे की, तो आपले काका मसूद आलम यांच्यासोबत परळ ते दादरपर्यंत प्रवास करत होता. 

'ज्या दिवशी दुर्घटना झाली त्या दिवशी माझे काका परळला उतरले होते, आणि मी दादर स्थानकावर उतरलो होतो. या दुर्घटनेत माझे काका मसूद आलम यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर मीडिाने माझ्याशी संपर्क साधत काकांचा फोटो मागितला. माझ्याकडे एकच फोटो होता ज्यामध्ये मी आणि काका सोबत होतो', असं इमरान शेखने सांगितलं आहे. काहीतरी गैरसमज झाला आणि मृतांमध्ये शेख असं नाव दाखवण्यात आलं. यानंतर इमरान शेखच्या मोबाइलवर मित्र आणि नातेवाईकांचे फोन आणि मेसेजेस येण्यास सुरुवात झाली. यानंतर इमरान शेखला मीडियामध्ये काकांच्या जागी आपला फोटो दाखवला जात असल्याचं कळलं. यानंतर त्याने तात्काळ प्रसारमाध्यमांशी संपर्क साधत आपली चूक सुधारण्यास सांगितलं. 

मीडियाने आपली चूक सुधारली पण एल्फिन्स्टन स्थानकाबाहेर लावण्यात आलेल्या बॅनरवरील फोटोचं काय करायचं हे इमरान शेखला कळत नव्हतं. स्थानिक नेत्यांनी हा बॅनर लावला असून, नेमका कोणाशी संपर्क साधायचा हे कळत नाहीये असं इमरान शेखने सांगितलं आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी पोलिसांनी कळवलं. 

एलफिन्स्टन - परळ पुलावर शुक्रवारी सकाळी नेमकं काय घडलं?- सकाळी 9.30 च्या सुमारास पावसाची मोठी सर आली.- त्याचवेळी मध्य रेल्वेवरील परेल आणि पश्चिम रेल्वेवरील एलफिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या.- त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पादचारी पुलावर गर्दी झाली.- त्याचवेळी पत्रा कोसळल्याचं सांगण्यात आलं.- गर्दीच्या वेळी मोठा आवाज झाल्याच्या गैरसमजातून धावपळ सुरु झाली.- ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली, लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडू लागले- एकमेकांना तुडवत लोकांची धावपळ सुरु झाली- सकाळी 9.30 च्या सुमारास थेट जखमी आणि मृतांचा आकडा समोर आला. तिघांचा मृत्यू.- जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.- काही मिनिटांतच मृतांचा आकडा वाढत गेला

टॅग्स :एलफिन्स्टन चेंगराचेंगरीमध्ये रेल्वेरेल्वे प्रवासीआता बास