Join us  

'बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पांतील भाडेकरूंच्या पात्रतेची महिन्याभरात निश्चिती'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 8:09 PM

प्रकल्पाची माहिती देणारे मोबाइल अॅप होणार तयार 

मुंबई:  ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बी डी. डी. चाळ पुनर्वसन प्रकल्पांतर्गत पात्रता निश्चिती कार्यवाहीतील अनिर्णयीत भाडेकरूंबाबत पात्रता निश्चितीची कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी आज संचालक बी. डी. डी. व सक्षम प्राधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांना आज एका बैठकीत दिले.  बी. डी. डी. चाळ पुनर्वसन प्रकल्प प्रगतिशील करण्यासाठी बी डी. डी. चाळ पुनर्विकास कृती समिती यांनी दिलेल्या निवेदनावरून म्हाडा, उपजिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांची म्हाडा मुख्यालयात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये चव्हाण यांनी बी डी. डी. चाळ पुनर्वसन प्रकल्प हा शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे बी. डी. डी. चाळ पुनर्विकास कृती समितीच्या सर्व सभासदांना पटवून दिले. या प्रकल्पाची व्याप्ती पाहता देशातील नागरी पुनरुत्थानाचा हा सर्वात मोठा प्रकल्प ठरतो. म्हणून हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यास शासन कटिबद्ध असून रहिवाशांचे सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. यावर उपस्थित रहिवाशी प्रतिनिधींनी हा पुनर्विकास प्रकल्प लवकरात लवकर सुरु होण्यासाठी सहमती दर्शविली व अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही झाली पाहिजे, असे आग्रही मत मांडले. बी. डी. डी. चाळ पुनर्वसन प्रकल्पातील लाभार्थी रहिवाशांची प्रकल्पाबाबतची  उत्सुकता लक्षात घेता तसेच या  प्रकल्पाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक ठेवण्यासाठी लवकरच मोबाइल अॅप तयार करण्यात येणार आहे. या मोबाइलला अॅपमध्ये प्रकल्पाचे आराखडे, रहिवाशांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आदीं माहितीचा समावेश असणार आहे. तसेच रहिवाशांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देणारी एक माहिती पुस्तिका तयार करण्यात येत असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी दीपेंद्र कुशवाह यांनी याप्रसंगी दिली . रहिवाशांच्या मागणीवरून तीनही प्रकल्पांच्या ठिकाणी नमुना सदनिकेसह प्रकल्पाच्या नियोजनाचे सर्व प्रारूप आराखडे मॉडेल स्वरूपात दाखविण्याची व्यवस्था लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन चव्हाण यांनी दिले. शिवडी येथील बी. डी. डी. चाळ पुनर्वसन प्रकल्पाचा सुसाध्यता अहवाल म्हाडातर्फे मुंबई बंदर न्यासाकडे सादर करण्यात आला असून लवकरच हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे व योग्य पाठपुरावा करून राज्यशासनातर्फे हा प्रकल्प लवकरच हाती घेण्यात येईल, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. या बैठकीमध्ये भाजपचे मुंबई सरचिटणीस सुनील राणे , नायगावचे आमदार कालिदास कोळंबकर, नायगावमधील नगरसेविका उर्मिला पांचाळ, उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे आणि अंजली भोसले, बी. डी. डी. चाळ पुनर्विकास कृती समितीचे पदाधिकारी रमेश जगताप, किरण माने, कृष्णकांत नलगे आदी उपस्थित होते . 

टॅग्स :मुंबई