नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी मागविण्यात आलेल्या जागतिक पात्रता विनंती प्रस्तावाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. ३१ मार्चपर्यंत पूर्व पात्रता यादी जाहीर करण्यात येणार असून, या यादीतील अर्जदारच अंतिम निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास पात्र असणार आहेत.सार्वजनिक व खाजगी भागीदारी तत्त्वावर विकसित केल्या जाणाऱ्या ग्रीनफिल्ड नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी सिडकोने ५ फेब्रुवारी २०१४ रोजी जागतिक निविदेद्वारे पात्रता विनंती प्रस्ताव मागविले होते. मात्र विविध कारणांमुळे प्रस्तावांच्या सादरीकरणाला तीन वेळा मुदतवाढ दिली होती. त्यानुसार याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याची बुधवारी अंतिम मुदत होती. या मुदतीच्या आत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ४ कंपन्यांनी अर्ज सादर केले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या केवळ ख्यातनाम व सक्षम निविदाकारांनी अर्ज प्रक्रियेत सामील व्हावे या दृष्टिकोनातून पात्रता विनंती प्रस्तावात पात्रतेसाठी दरवर्षी ६० दशलक्ष प्रवासी वाहतूक सेवा हाताळू शकण्यासाठी तांत्रिक, आर्थिक व संचलनदृष्ट्या सक्षम असणे बंधनकारक केले होते. दरम्यान, पात्रता विनंती प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे पूर्वपात्र अर्जदारांची यादी ३१ मार्चपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. या यादीतील अर्जदारच अंतिम निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास पात्र असतील, असे सिडकोकडून स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
प्रकल्पासाठी चार कंपन्यांचे पात्रता प्रस्ताव
By admin | Updated: January 30, 2015 01:35 IST