Join us  

राणीच्या बागेत यापुढे दिसणार नाही हत्ती; केंद्र सरकारच्या निर्णयाचं करावं लागणार पालन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 1:20 AM

दक्षिण मुंबईत स्थित राणीच्या बागेतील प्राणी, पक्षी पाहण्यासाठी मुंबई आणि राज्यभरातून पर्यटक येतात.

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील लक्ष्मी या हत्तीच्या मृत्यूनंतर येथे केवळ एक हत्तीण राहिली आहे. अनारकली असे तिचे नाव आहे. दरम्यान, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे यापुढे कोणत्याच प्राणिसंग्रहालयात नव्याने हत्ती ठेवता येणार नाही. त्यामुळे राणीच्या बागेत हत्ती दिसणार नाही.

दक्षिण मुंबईत स्थित राणीच्या बागेतील प्राणी, पक्षी पाहण्यासाठी मुंबई आणि राज्यभरातून पर्यटक येतात. शिवाय येथे मोठ्या प्रमाणावर विविध प्रजातींची झाडे आहेत. राणीची बाग पर्यटकांच्या पसंतीस उतरावी म्हणून मुंबई महापालिका सातत्याने काम करत असते. बागेच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून, येथे देशासह देशाबाहेरून आणलेल्या प्राण्यांचे वास्तव्य आहे. येथे काेरियाहून पेंग्विनचे आगमन झाल्यानंतर राणीची बाग चर्चेचा विषय तसेच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली हाेती. 

१९७७ मध्ये लक्ष्मी या हत्तीणीला बिहार येथून आणण्यात आले होते. तेव्हा ती २० वर्षांची होती. राणीच्या बागेत सुमारे ४४ वर्षे राहिल्यानंतर तिचा नुकताच वृद्धापकाळाने मृत्यू झाला. तर राणीच्या बागेतील अनारकली या दुसऱ्या हत्तीणीचे वय ५४ आहे. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले की, प्राणिसंग्रहालयात हत्ती ठेवता येणार नाही, हा निर्णय आम्ही घेतलेला नाही. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडील माहितीनुसार प्राणिसंग्रहालयात आता नव्याने हत्ती ठेवता येणार नाही आणि देशात सर्वत्र हे लागू होते. आमच्याकडे असलेल्या हत्तीचा आम्ही सांभाळ करत आहोत.                                  

होतोय कायापालटराणीची बाग पर्यटकांच्या पसंतीस उतरावी म्हणून मुंबई महापालिका सातत्याने काम करत असते. बागेच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. 

टॅग्स :केंद्र सरकार