Join us
Daily Top 2Weekly Top 5

टिटवाळ्यात हागणदारीमुक्तीचे ‘वाजले की बारा’

By admin | Updated: June 19, 2014 01:17 IST

संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचा राज्य शासनाने संकल्प केला. त्यादृष्टीने प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत आदेश काढण्यात आले. घर तिथे शौचालय, शहरी भागात वस्ती शौचालय अशी योजना राबवण्यात आली.

उमेश जाधव, टिटवाळासंपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचा राज्य शासनाने संकल्प केला. त्यादृष्टीने प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत आदेश काढण्यात आले. घर तिथे शौचालय, शहरी भागात वस्ती शौचालय अशी योजना राबवण्यात आली. प्रशासनाने हागणदारीमुक्तीची योजना शहरी व ग्रामीण भागांतून राबवण्यास सुरुवात केली. परंतु, टिटवाळा येथील रिजन्सी विकासकाच्या हजारो कामगारांनी उघड्यावर शौचालयास बसून हागणदारीमुक्तीचे बारा वाजवले आहेत.राज्य शासनाने संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्राम स्वच्छता अभियानाचा विडा उचलला आहे. यासाठी ग्रामीण भागांत घर तेथे शौचालय सुरू करण्यात आले आहे. कोणीही उघड्यावर शौचालयासाठी बसल्यावर ग्रामपंचायत स्तरावर दंड आकारणी लागू करण्यात आली. त्यासाठी निर्मल ग्राम पुरस्कार देऊन ग्रामपंचायतींना सन्मानितही करण्यात आले आहे. तसेच शहरी भागांतील जनतेला सुलभ शौचालय बांधून देण्यात आले आहे. त्यासाठी लाखोंचा निधी खर्च करण्यात आला. परंतु, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या टिटवाळा प्रभागात या शासनाच्या योजनेचे रिजन्सी विकासकाने मात्र बारा वाजवले आहेत. या विकासकाचे गृहनिर्माण संकुलाच्या कामासाठी हजारो कामगार या ठिकाणी काम करतात. विकासकाने मात्र त्यांच्या सोयीसाठी शौचालयाची (प्रातर्विधीची) कोणतीही व्यवस्था न केल्याने हे हजारो कामगार सकाळी-सकाळी टिटवाळा मंदिर रोड या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेवर शौचास बसतात. यामुळे सकाळी व्यायामासाठी तसेच गणेशाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व इतर नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. या दुर्गंधीमुळे टिटवाळा शहराचे वातावरण प्रदूषित झाले आहे. या कारणास्तव टिटवाळा येथील जनतेला विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, या बाबीकडे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.