Join us
Daily Top 2Weekly Top 5

तारापोरवाला मत्स्यालयात शोभिवंत मासे कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 00:09 IST

पर्यटकांकडून नाराजीचा सूर; पैसे वाया जात असल्याची तक्रार

मुंबई : तारापोरवाला मत्स्यालयात ऑक्टोपस, बॉटम शार्क, स्टारफिश इत्यादी ५० प्रकारचे समुद्री जीव पर्यटकांना बघायला मिळणार होते. काही समुद्री जीव अजूनही मत्स्यालयात दाखल झालेले नाहीत. त्यामुळे अजून किती दिवस पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल पर्यटकांनी केला आहे.मत्स्यालयात प्रवेशासाठी प्रत्येकी व्यक्तीमागे ६० रुपये तर लहान मुलांसाठी ३० रुपये प्रमाणे तिकीट दर आकारला जातो; परंतु मत्स्यालयात बघण्यासारखे मासेच नसल्यामुळे तिकीटाचे पैसे वाया जात असल्याची माहिती एका पर्यटकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली़ सध्या काही प्रदर्शन टाक्या रिकाम्या आहेत. लहान मुलांना समुद्रातील माशांबद्दल खूपच वेड असते. त्यामुळे मुंबई, ठाणे व नवी मुंबई येथून पर्यटक बच्चेकंपनी सोबत मत्स्यालयाला भेटी देतात. परंतु आकर्षक मासे नसल्यामुळे बच्चे कंपनी कंटाळू घरी जाण्यासाठी सुर ओढतात.महाविद्यालयीन विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने मत्स्यालयात येतात. परंतु चांगले मासेच पाहायला मिळत नसल्यामुळे ते समोरील समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारण्यास पसंती देतात. आॅक्टोपस बघण्याकरिता मत्स्यालयाकडे पर्यटकांची वारंवार मागणी सुरू आहे. तसेच पिºहाना मासाही पाहण्याची इच्छा पर्यटकांनी व्यक्त केली आहे.पर्यटकांच्या मागणी आणि हौसेखातर शोभिवंत मासे मत्स्यालयात आणण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी त्यात दिरंगाई निर्माण होताना दिसून येते. तारापोरवाला मत्स्यालयाचे अभिरक्षक पुलकेश कदम यांनी सांगितले, तारापोरवाला मत्स्यालयात नवीन समुद्री जीव अद्याप आलेले नाहीत. परंतु लवकरच शोभिवंत मासे पर्यटकांच्या भेटीला येतील.