Join us  

Electricity Update: ‘वीज’डाउनमुळे मुंबईचे जनजीवन ठप्प; लोकलसेवाही थांबली, उद्योगांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 3:23 AM

मुंबई महानगर क्षेत्रालाही फटका; चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : महापारेषणच्या कळवा-पडघा केंद्रात अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह लगतच्या प्रदेशात सोमवारी सकाळी १० वाजता खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे या भागात एकच हाहाकार उडाला. इतिहासात प्रथमच मुंबई महानगरीत दिवसभर बत्ती गुल होण्याचा प्रकार घडला. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वंकष चौकशीचे निर्देश संबंधितांना दिले. तसेच ज्या कारणांमुळे ही घटना घडली, त्या वाहिन्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याच्या सूचनाही विभागांना दिल्या.दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत बहुतांश ठिकाणी सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झाल्याचा दावा महावितरण, बेस्ट, टाटा आणि अदानी या वीज कंपन्यांनी केला असला, तरी प्रत्यक्षात भांडुप, मुलुंडसह ठाणे आणि नवी मुंबईतील बहुतांश भाग रात्री उशिरापर्यंत अंधारात होते.का झाली वीज खंडित?1) मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या चार ४00 केव्ही वीजवाहिन्या आहेत. पैकी कळवा-तळेगाव (पॉवरग्रीड) वाहिनी रविवारी कंडक्टर तुटल्याने बंद झाली. झालेला बिघाड हा सह्याद्री रांगांच्या माथ्यावरील दुर्गम भागात असल्याने तेथे काम करणे अत्यंत खडतर होते.2) ४00 के.व्ही. पडघा-कळवा वाहिनी-१ सोमवारी पहाटे ४ वाजून ३३ मिनिटाला ओव्हर व्होल्टेजमुळे बंद पडली. उर्वरित दोन वाहिन्यांतून पुरवठा सुरळीत सुरू होता.3) सकाळी १० वाजता पडघा-कळवा वाहिनी-२ बिघाड झाल्याने बंद झाली आणि मुंबईची वीजव्यवस्था आयलँडिंगवर गेली. त्याचवेळेस टाटा पॉवरचे ५00 मेगावॅट आणि अदानीचे २५0 मे.वॅ.चे डहाणू येथील वीजनिर्मितीसंच बंद झाल्यामुळे मुंबईतील वीजपुरवठा बाधित झाला.ऑनलाइन क्लासला सुट्टीखंडित वीजपुरवठ्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सोमवारी दुपारी १२ ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या लोकलसाठीचा वीजपुरवठा सुरळीत सुरू झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला. तोवर लोकल प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. विशेषत: शाळा आणि कॉलेजच्या आॅनलाइन क्लासलाही खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसला. बहुतांश शाळा, कॉलेजचे ऑनलाइन क्लास सोमवारी झालेच नाही.बँका, एटीएमही बंदजागोजागी बंद पडलेल्या लोकलमधून प्रवाशांना पोलिसांच्या मदतीने खाली उतरविण्यात आले. लोकलमधील प्रवाशांसाठी मुंबई महापालिकेने आपले शेल्टरही तयार ठेवले होते. सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूककोंडी वाढली. सर्वत्र बँकांचे काम ठप्प झाले. अनेक बँकांनी तर शटरडाऊन केल्याचे चित्र होते. तर, अनेक एटीएममध्ये पैसे असले, तरी बॅटरी बॅकअप नसल्याने ग्राहकांना अडचणी आल्या. वर्क फ्रॉम होमलाही फटका बसला.

टॅग्स :वीज