कुडूस : महावितरणचा अनागोंदी कारभार ग्राहकांना दिवसेंदिवस त्रासदायक ठरत आहे. मनात येईल तेव्हा खंडीत केला जाणारा वीजपुरवठा, वारा पावसाचे निमित्त साधून दिवस रात्र गायब होणारी वीज, तक्रार देऊनही विलंबाने होणारी मीटर दुरूस्ती, रिडींग न घेताच मनमानी आकारली जाणारी देयकांची बिले, बिले कमी करून घेण्यासाठी वाडा कार्यालयात घालाव्या लागणाऱ्या खेटा यामुळे ग्राहकात प्रचंड संताप आहे.वाड्यात डी प्लस झोन आल्याने चांगला वीजपुरवठा व्हावा म्हणून गांध्रे येथे स्वतंत्र उच्च क्षमतेचे उपकेंद्र उभारण्यात आले. मात्र पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी तालुक्यातील आबिटघर, कुडूस, कोंढले, खानिवली परिसरात तक्रारींचा पाऊस असतो. जुने सडलेले पोल, नेहमीच वारा पावसात तुटून पडणाऱ्या वीजवाहक तारा यामुळे सतत वीजपुरवठा खंडीत होतो. याचा फटका कंपन्यांच्या उत्पादनावर होतो. त्याचप्रमाणे तो व्यापारी, किरकोळ विक्रेते, हॉटेल व्यवसाय यांना बसतो. घरगुती वापराबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. जुने मीटर अर्ज देऊनही महीनोन्महिने बदली न करणे, बंद व नादुरूस्त मीटरच्या तक्रारी देऊनही त्या बाबत लक्ष न देणे, रिडींग घेताना मीटरचा फोटो न घेणे अंदाजे बिले आकारणे, या तक्रारी ग्राहकांच्या असून तक्रारी संबंधात कुडूस व वाड्यात कार्यालयात भेट दिली असता अभियंता भेटत नसल्याचे ग्राहकांनी तक्रारीत म्हंटले आहे.पैसे भरल्यानंतरही नवीन मीटर न देणे, वीजचोरी करणाऱ्यांना अभय देणे, कृषीपंपासाठी मागणी करूनही दोन तीन वर्ष उलटूनही वीजजोडणी न देणे या मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे भाजीपाला, फुलमळा सुकल्याची तक्रार बिलावली येथील जनार्दन पाटील यांनी केली आहे. याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)
ग्राहकांना दरमहा वीजबिलांचा शॉक
By admin | Updated: April 1, 2015 22:34 IST