Join us  

इलेक्ट्रीकल स्कूटर, सायकलने जा मेट्रो स्थानकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 1:29 AM

मेट्रो स्थानकांपासून इलेक्ट्रीक स्कूटर, सायकल आणि मेट्रो स्थानकांपासून बसेसची सुविधा देणाऱ्या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.

मुंबई : मेट्रो स्थानकांपासून इलेक्ट्रीक स्कूटर, सायकल आणि मेट्रो स्थानकांपासून बसेसची सुविधा देणाऱ्या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना मेट्रो स्थानकांपासून आपल्या घरापर्यंत जाण्यासाठी बसेस, सायकल, इलेक्ट्रीक सायकल असे विविध पर्याय असल्याने चांगली कनेक्टीव्हीटी मिळणार आहे. यासह मेट्रो स्थानकांवर गर्दीचे नियोजन करण्यासाठी मेट्रो स्थानकांवर एआई पावर इमेजिंग टेक्नोलॉजीचा उपयोग करण्यात येणार आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट (डब्लूआरआय) इंडिया रॉस सेंटर यांनी स्टेशन एक्सेस अ‍ॅण्ड मोबोलिटी प्रोग्रॅम (स्टँम्प) २०१९ याचे आयोजन केले होते. यामध्ये तीन कंपन्यांनी बाजी मारली. यामध्ये मुंबई मेट्रो स्थानक, परिसरात गर्दीचे नियोजन करण्याच्या कामासाठी या विजेत्यांना आपला पथदर्शी प्रकल्प राबवता येणार आहे.सार्वजनिक वाहतूक सेवा आणखी सुधारण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो स्थानकांपासून बससेवा सुरू करण्याचे ठरवले आहे. ही बस सेवा प्रायोगिक तत्त्वावर वर्सोवा ते घाटकोपर दरम्यानच्या मेट्रो-१ स्थानकांदरम्यान सुरू करण्यात येणार आहे. ही बस प्रथम पवई ते घाटकोपर, जागृतीनगर, मरोळ नाका दरम्यान चालवण्यात येणार आहे. यानंतर सुरू होणाºया मेट्रो मार्गिकांच्या मेट्रो स्थानकांपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे आॅलमाईल्स या बस कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. तसेच ज्या खासगी संस्था, कंपन्या अथवा विभागांमध्ये मेट्रो पोहोचलेली नाही असे भाग किंवा संस्था या बसमुळे मेट्रो मार्गिकांशी जोडले जातील, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी या वेळी स्पष्ट केले. या मार्गावर दर दहा मिनिटांनी बसेस सोडण्यात येणार आहेत. या बसेस एसी आणि नॉन एसी असतील. यानुसार या बसचे भाडे ३ ते ४.५० रुपये प्रति/किमी नुसार आकारण्यात येणार आहेत.तसेच प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी स्कूटर वापरता येणार आहे. वांद्रे-बीकेसी-कुर्ला या मार्गावर इलेक्ट्रीक स्कूटर आणि सायकल सेवा सुरू करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. मेट्रो प्रवासी भाड्यावर स्कूटर किंवा सायकल घेऊन आपल्या इच्छितस्थळी जाऊ शकतील. लवकरच या मार्गांवर पार्किंगची सेवा उपलब्ध करून ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. तीन महिने ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू ठेवणार असून नंतर सर्व स्थानकांवर ही सेवा सुरू करण्यात येईल, असे एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव या वेळी म्हणाले.

टॅग्स :मेट्रो