मुंबई : निवडणूक निकालांच्या एक दिवस आधी आज मुंबई शेअर बाजार ९0 अंकांनी वर चढला. एप्रिलमधील ठोक महागाई घटल्यामुळे बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला. बाजार २३,९0५.६0 अंकांवर बंद झाला. ३0 कंपन्यांच्या शेअर्सवर आधारित मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी मजबुतीसह उघडला. एका टप्प्यावर तो २३,९७१.७८ अंकांवर पोहोचला होता. थोडासा धक्का मिळाला असता तरी सेन्सेक्स २४ हजारांवर पोहोचला असता. तथापि, नंतर तो थोडा खाली आला. रिअल्टी, कॅपिटल गुडस्, आयटी, मेटल, हेल्थकेअर आणि आॅटो या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात नफा वसुली दिसून आली. त्याचा फटका बसून सेन्सेक्स खाली आला. एका क्षणी तो २३,७४२.७५ अंकांपर्यंत खाली आला होता. दिवस अखेरीस ९0.४८ अंकांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २३,९0५.६0 अंकांवर बंद झाला. गेल्या सत्रात सेन्सेक्स ५६.११ अंकांनी कोसळला होता. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी १४.४0 अंकांनी वाढून ७,१२३.१५ अंकांवर बंद झाला. दिवसभरात तो ७,१५२.५५ ते ७,0८२.५५ अंकांच्या दरम्यान खालीवर होत होता. (प्रतिनिधी)
निवडणूक निकालाआधी बाजार ९0 अंकांनी वाढला
By admin | Updated: May 16, 2014 04:58 IST