Join us

परीक्षा काळातच निवडणूक प्रशिक्षण; पॅटची परीक्षा ८ एप्रिलला घेण्याची मुभा

By रेश्मा शिवडेकर | Updated: April 3, 2024 22:17 IST

अपवादात्मक परिस्थिती म्हणजे परीक्षेच्या कालावधीतच शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षण असल्यास त्या दिवशीचा पेपर ७ एप्रिलला घेण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे.

मुंबई - संकलित मूल्यमापन चाचणी -२च्या (पॅट) परीक्षा असतानाच शिक्षकांना निवडणुकीचे प्रशिक्षण लागल्याने गैरसोय टाळण्याकरिता शाळांना प्रशिक्षणाच्या दिवशी असलेला पेपर ८ एप्रिलला घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातील सरकारी व अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे लोकसभा निवडणूक प्रशिक्षण १ एप्रिलपासून सुरू झाले आहे. हे प्रशिक्षण १५ एप्रिलपर्यंत चालणार आहे. मात्र या दरम्यान म्हणजे ४ ते ६ एप्रिल दरम्यान पॅट परीक्षांचे आयोजन राज्यभर कऱण्यात आले आहे.या परीक्षा राज्यभर एकाचवेळी होणे अपेक्षित आहे. परंतु, शिक्षक प्रशिक्षणाला गेल्यास शाळांना अपुऱया मनुष्यबळाअभावी परीक्षा घेणे शक्य होणार नाही. म्हणून ही मुभा देण्याचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) घेतला आहे.

सकाळच्या सत्रात परीक्षा घेऊन शिक्षकांनी निवडणूक प्रशिक्षणास उपस्थित राहावे. मात्र अपवादात्मक परिस्थिती म्हणजे परीक्षेच्या कालावधीतच शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षण असल्यास त्या दिवशीचा पेपर ७ एप्रिलला घेण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे. परिषदेच्या सूचनेनुसार मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मुंबईतील शाळांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे.