Join us

निवडणूक प्रचार, रॅलींचा फटका गृहिणींनाही

By admin | Updated: October 10, 2014 23:01 IST

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रचाराला रंग चढत आहे. मात्र या राजकीय प्रचाराच्या रंगामुळे नोकरदार महिलांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे

पनवेल : विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रचाराला रंग चढत आहे. मात्र या राजकीय प्रचाराच्या रंगामुळे नोकरदार महिलांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. घरकाम करणाऱ्या ‘मावशी’ कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या प्रचार रॅलीत सहभागी होण्यासाठी अचानक सुट्टी घेत असल्याने आॅफिस आणि घरकाम सांभाळताना या महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील बहुतांश उमेदवारांनी घरोघरी प्रचार, रॅलीवर भर दिला आहे. त्यासाठी त्यांना कार्यकर्त्यांचीच नव्हे शक्तिप्रदर्शनासाठी मोठ्या जनसमुदायाची गरज असते. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांना, मदतनिसांना प्रचार रॅलीत सहभागी करून घेण्यावर राजकीय पक्षांनी जोर दिला आहे. जेवढा पगार या महिलांना एक महिन्याला मिळतो, तेवढे पैसे एक-दोन रॅलीत मिळत असल्याने, कामावर दांडी मारून प्रचार रॅलीत सहभागी होणे त्यांच्याही फायद्याचे ठरत आहे.