Join us  

'सुखानं सोबत जगलो, आम्हाला मृत्यूदेखील सोबतच मिळावा', मुंबईतील वृद्ध दाम्पत्याचे इच्छामरणासाठी राष्ट्रपतींना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 12:06 PM

''अनेक वर्षे सुखानं सोबत जगलो, आता आम्हाला सोबत मृत्यूदेखील मिळावा'', असे सांगत चर्नी रोड येथील एका वृद्ध दाम्पत्यानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे.

मुंबई -  ''अनेक वर्षे सुखानं सोबत जगलो, आता आम्हाला सोबत मृत्यूदेखील मिळावा'', असे सांगत चर्नी रोड येथील एका वृद्ध दाम्पत्यानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे.  नारायण लवाटे आणि इरावती लवाटे अशी या दोघांची नावे आहेत. नारायण लवाटे हे  86 वर्षांचे तर इरावती लवाटे या 79 वर्षांच्या आहेत. मागील काही वर्षांपासून त्यांनी ही मागणी लावून धरली आहे. मात्र त्यांना याबाबत काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आता थेट राष्ट्रपतींनाच पत्र लिहिले आहे.

‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नाच्या पहिल्याच वर्षी लवाटे दाम्पत्यानंमूल जन्माला घालायचे नाही, असा निर्णय घेतला.  त्यामुळे त्यांना कुणीही वारस नाही. अनेक वर्षे सोबत सुखाने जगलो आता आम्हाला सोबत मृत्यू मिळावा म्हणून आम्ही इच्छा मरणाची मागणी केली आहे असे या दोघांनी म्हटले आहे. इच्छामरणाचा कायदा व्हावा म्हणून हे दाम्पत्य 30 वर्षे पाठपुरावा करते आहे. नारायण लवाटे हे एस.टी. महामंडळाच्या अकाऊंट विभागात कार्यरत होते. तर इरावती लवाटे या गिरगावातील आर्यन हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. आता दोघेही गिरगावातील ठाकूरद्वार भागात असलेल्या चाळीत राहतात. दोघांनी एकमेकांना आयुष्यभर साथ केली, आता मृत्यूदेखील सोबत यावा, अशी इच्छा या दोघांनीही व्यक्त केली आहे.

भारतातील न्याय व्यवस्था इच्छामरणाला परवानगी देत नाही. मात्र अंथरूणाला खिळून कुणावर तरी त्याचा बोजा पडण्याआधी आम्हाला मृत्यू हवा आहे अशी मागणी या दोघांनी केली आहे. इच्छामरणाचा हक्क मिळायला हवा अशी मागणी करणारे पत्र आम्ही राष्ट्रपतींना लिहिले आहे, असे लवाटे दाम्पत्याने म्हटले आहे.    

टॅग्स :मुंबई