Join us

वागळे इस्टेट परिसरात एकनाथ शिंदेंच्या प्रचाराचा धडाका...

By admin | Updated: October 10, 2014 23:31 IST

या प्रचार फेरीदरम्यान जागोजागी सुवासिनींनी त्यांना ओवाळले तसेच नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले

ठाणे : कोपरी- पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सकाळच्या सत्रात वागळे इस्टेट परिसरातील इंदिरानगर, ज्ञानोदय शाळा, मयूर सोसायटी, वरचा म्हाडा, श्री सोसायटी, डेनुस कम्पाउंड, यशोधननगर, ठाकूर कॉलेज या विभागात प्रचार फेरी काढली. या प्रचार फेरीदरम्यान जागोजागी सुवासिनींनी त्यांना ओवाळले तसेच नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. परिसरातील सर्व नागरिकांनी शिंदे यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी मुस्लिम व शीख बांधवांनीही शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर करून विजयासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रचार फेरीत महापौर संजय मोरे, शहरप्रमुख रमेश वैती, स्थानिक नगरसेवक दशरथ पालांडे, नगरसेविका कांचन चिंदरकर, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सायंकाळच्या सत्रात इंदिरानगर नाका येथे झालेल्या जाहीर सभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या सभेत उपस्थितांशी संवाद साधताना महिलांवरील होणारे अत्याचार थोपविण्याबरोबरच महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त, व काँग्रेसमुक्त करण्यासाठी येत्या १५ तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी धनुष्यबाणावर शिक्का मारून शिवसेना उमेदवारांना बहुमतांनी निवडून देऊन विधानभवनावर भगवा फडकावून बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. विकासाच्या मार्गावर चालण्यासाठी महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन डॉक्युमेंटही शिवसेना कार्यप्रमुखांनी तयार केल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. (प्रतिनिधी)