मुंबई : महान वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांनी २५ वर्षांपूर्वी १९१५ रोजी सापेक्षतावादाच्या सिद्धांताची देणगी दिली. भौतिकशास्त्रातील क्रांतिकारी टप्पा असलेल्या या घटनेचा शतक महोत्सव जगभर साजरा होत आहे. या ऐतिहासिक क्षणाच्या उत्साहात जागतिक समुदायासोबत महाराष्ट्रानेही सहभागी व्हायला हवे, असे आवाहन आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केले आहे. या शहरातील एखादा महत्त्वाचा रस्ता किंवा चौकाला अल्बर्ट आइनस्टाइन यांचे नाव द्यावे, तेथे त्यांचा साजेसा पुतळा उभारावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.खरे तर, जागतिक पातळीवर विज्ञान, कला, संस्कृती, साहित्य आणि राजकारण अशा क्षेत्रांत उत्तुंग स्थान मिळविलेल्या विदेशी व्यक्तींची प्रेरणास्थाने घडविण्यात इतर शहरांच्या तुलनेत मुंबई नेहमीच पिछाडीवर राहिली आहे. हा कलंक पुसून टाकण्यासाठी आइनस्टाइन यांच्या स्मारकाची उभारणी ही उत्तम सुरुवात ठरेल, असेही पत्रात म्हटले आहे.याप्रमाणेच आइनस्टाइनच्या सापेक्षता वादाच्या सिद्धांताचा शताब्दी महोत्सव राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठ यांनी साजरा करावा, याबाबत राज्य शासनाला आवाहन करावे. तसेच इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सचे पुनरुज्जीवन करावे, अशा सूचनांचाही समावेश आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक मुख्यमंत्री परिषद नेमावी. या समितीमध्ये मान्यवर वैज्ञानिक आणि नावीन्याचा ध्यास असणाऱ्या संशोधकांचा समावेश असावा. ही समिती राज्य शासनाला विज्ञानासंदर्भातील विषयामध्ये सल्ला देऊ शकेल आणि ‘महाराष्ट्राच्या विज्ञान-तंत्रज्ञान आराखड्या’ची निर्मिती करू शकेल. विज्ञाननिष्ठ संशोधन आणि विकासाबाबत नवे मार्ग धुंडाळून अशा मोठ्या समस्यांवर उपाययोजना शोधण्याची गरज असल्याचे नमूद करत ओरआरएफने ही मागणी केली आहे.
आइनस्टाइन यांचे स्मारक व्हावे
By admin | Updated: November 25, 2015 02:35 IST