मुंबई : लोकल अपघातात अनेक जणांचे बळी जात असून ही संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच जात आहे. गेल्या दोन दिवसांत लोकल अपघातात अठरा जणांचा मृत्यू झाला असून तब्बल २६ जण जखमी झाले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गर्दीच्या वेळेत हे बळी गेल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वे अपघातात अडीच ते तीन हजार प्रवाशांचे बळी जात आहेत. तर तेवढ्याच प्रमाणात जखमीही होत आहेत. रेल्वे रूळ ओलांडताना लोकलची ठोकर लागणे, लोकलमधून पडणे, लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडणे, खांब लागून अपघात होण्याच्या घटनांमुळे बळी जात आहेत. हे अपघात होऊ नयेत म्हणून दोन रुळांच्या दरम्यान कुंपण घालणे, रूळ ओलांडू नये म्हणून काही ठिकाणी पादचारी पूल उपलब्ध करून दिले जात आहेत. तर रेल्वेकडून धोकादायक खांबही काढून टाकण्यात आले आहेत. तरीही प्रवाशांकडून प्रवासात कुठलीही खबरदारी न घेता निष्काळीपणा दाखवला जातो आणि त्यामुळे आपला जीव गमवावा लागतो. ८ आॅगस्ट आणि ९ आॅगस्ट या दोन दिवसांत अठरा प्रवाशांचा लोकल अपघातात मृत्यू झाला असून तब्बल २६ प्रवासी जखमी झाले आहेत. ८ आॅगस्ट रोजी ९ प्रवाशांचा मृत्यू असून १७ प्रवासी जखमी तर ९ आॅगस्टला ९ प्रवाशांचा मृत्यू आणि ९ जण जखमी झाल्याचे रेल्वे पोलिसांतील सूत्रांकडून सांगण्यात आले. यातील बहुतांश प्रवाशांचे मृत्यू गर्दीच्या वेळेत झाले आहेत. (प्रतिनिधी)
दोन दिवसांत अठरा जणांचा मृत्यू
By admin | Updated: August 11, 2014 04:17 IST