Join us  

अवघ्या आठ वर्षांच्या चिमुरड्याने सर केला लिंगाणा किल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 1:55 PM

"गडकिल्ले वाचवा, महाराष्ट्र वाचवा"

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : बुलंद, बेलाग किल्ले लिंगाणा, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाच्या पूर्वेस सह्याद्री डोंगर रांगेजवळच हा किल्ला दिमाखात उभा आहे. समुद्रसपाटीपासून जवळपास ३००० फूट उंचीवर रायगड जिल्ह्यात असलेल्या या किल्ल्याचा वापर शिवकाळात स्वराज्य द्रोह्यांसाठी तसेच शत्रूंसाठी कारागृह म्हणून केला जात होता. चढाईसाठी अत्यंत कठीण असलेला हा किल्ला कारागृहासाठी योग्य ठिकाणी होते, कारण बंदिस्त कैद्याने पळून जायचे ठरवले तरी ते अश्यक होते.

मुंबईतील घाटकोपरमध्ये राहणाऱ्या आठ वर्षीय कार्तिक भरत मोरे या चिमुकल्याने लिंगाणा किल्ला दोराच्या सहाय्याने सर केला. गेल्या १० डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता कार्तिकने किल्ला चढाईला सुरुवात केली. अवघड निसरड्या वाटा, कातळटप्पे पार करत सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास त्याने  किल्ले लिंगाणाचे गगनचुंबी शिखर सर केले आणि किल्ल्यावर पोहचून भगवा ध्वज व तिरंगा फडकवत त्याने "गडकिल्ले वाचवा, महाराष्ट्र वाचवा" हा संदेश दिला. 

कार्तिक हा घाटकोपर येथील एल.डी.दोषी शाळेत इयत्ता तिसरीत शिकत असून त्याला वयाच्या पाचव्या वर्षापासून त्याच्या गिर्यारोहक वडिलांमुळे गडकिल्ले फिरण्याची आवड निर्माण झाली.आतापर्यंत कार्तिकने कलावंतीण सुळका, माणिकगड, रायगड,  वंदनगड असे तब्बल ३५ किल्ले सर केले आहेत. 

सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्गसंवर्धन संस्थेत कार्यरत असणारे कार्तिकचे वडील भरत मोरे आणि त्यांचे सहकारी सुदेश नांगरे, रोशन घाडी व टीमच्या सहकार्याने ही मोहीम पार पडली, अशी माहिती कार्तिकने दिली. 

टॅग्स :मुंबई