Join us  

कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी पालिकेचे युद्धपातळीवर सुरू आहेत प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 5:49 PM

चेस द व्हायरस आणि झिरो मिशन या दोन उपक्रमांना के पश्चिम वॉर्ड मध्ये चांगले यश मिळत असल्याचे चित्र असून येथे कोरोनाचा विळखा  सैल होत आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई :  पश्चिम उपनगरातील विलेपार्ले पश्चिम,अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी पश्चिम या तीन प्रमुख भागांचा मिळून पालिकेचा के पश्चिम वॉर्ड तयार होतो.या वॉर्ड मध्ये अंधेरी पश्चिम व वर्सोवा असे असे दोन विधानसभा मतदार संघ येत असून या वॉर्डची लोकसंख्या सुमारे 6 लाखांच्या आसपास आहे. येथे इमारतीचे पसरले जाळे,गनचुंबी इमारतीत राहणारे उचभ्रू नागरिक,चाळी व मोठ्या प्रमाणात असलेले स्लम वस्ती,अनेक सिनेतारकांचे असलेले वास्तव्य,प्रसिद्ध जुहू बीच,वेसावे कोळीवाडा,8 जून 2014 साली मुंबईतील वर्सोवा ते घाटकोपर अशी धावू लागलेली पहिली मेट्रो अशी जानपहचान या वॉर्डची आहे. त्यातच सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि  त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना कोरोना झाल्यामुळे पालिकेच्या के पश्चिम वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त, त्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची गेल्या रविवारी धावपळ सुरू झाली आणि आणि देशात हा वॉर्ड चर्चेत आला होता.

गेल्या एप्रिल,मे व जून महिन्यात कोरोनाचे रुग्ण या वॉर्ड मध्ये जास्त प्रमाणत आढळत असल्याने हा वॉर्ड हॉट स्पॉट म्हणून देखिल ओळखला जाऊ लागला. मात्र पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अंधेरी क्रीडा संकुलात झिरो मिशन या नव्या योजनेचे गेल्या दि,22 जून रोजी मुंबईसाठी लोकार्पण केले. त्यांच्या चेस द व्हायरस आणि झिरो मिशन या दोन उपक्रमांना के पश्चिम वॉर्ड मध्ये चांगले यश मिळत असल्याचे चित्र असून येथे कोरोनाचा विळखा  सैल होत आहे. आयुक्तांच्या आदेशाने व  पश्चिम उपनगराचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी,परिमंडळ 4 चे उपायुक्त रणजित ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे आणि त्यांचे संबंधित अधिकारी व कर्मचारी येथे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अविरत मेहनत करत आहे. येथील स्लममध्ये कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेला यश मिळाले असून आता इमारती व उचभ्रू वस्त्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी आम्ही ठोस प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र नागरिकांनी नियमांचे पालन करून पालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मोटे यांनी केले आहे.

के पश्चिम वॉर्डमध्ये कोरोना बाधीत रुग्णांची आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची युद्धपातळीवर आम्ही शोधमोहिम घेतली. दि,13 पर्यंत इमारती व उचभ्रू वस्तीत 78,866 अतीजोखमीचे तर 14251 कमी जोखमीचे रुग्ण आढळून आले,तर स्लम मध्ये  69,624 अतीजोखमीचे तर 12,385 कमी जोखमीचे रुग्ण आढळून आले.यांची चाचणी केली असता 2757 कोरोना रुग्ण तर त्यांच्या संपर्कात आलेले 2205 व्यक्तींना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले अशी विस्तृत आकडेवारी मोटे यांनी दिली. आजमितीस के पश्चिम वॉर्डमध्ये कोरोनाचे रुग्ण 4961 इतके असून त्यापैकी 3430 रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहेत,तर 319 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1212 इतकी असल्याची माहिती त्यांनी दिली. के पश्चिम वॉर्ड मध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेणे,हाय रिस्क व लो रिस्क कोरोना रुग्ण शोधून काढून त्यांचे विलगिकरण करणे,मोबाईल व्हॅनच्या तसेच एनजीओच्या माध्यमातून

वस्ती वस्तीत आरोग्य शिबीर घेणे,जेष्ठ नागरिकांची ऑक्सिजन क्षमता तपासणे, ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून आले त्या ठिकाणी आणि सॅनिटायझेशन करणे आणि ती इमारत व लगतचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून अंमलबजावणी करण्यासाठी टीमची उभारणी करणे तसेच पोलिस यंत्रणेबरोबर बैठका घेणे,खाजगी वैद्यकीय डॉक्टरांबरोबर बैठका घेऊन त्यांची सेवा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणे, कोरोना रुग्णांना वेळीच उपचार मिळून ते कोरोनामुक्त होण्यासाठी कोरोना केअर सेंटरची उभारणी करणे,कोरोनाबाधीत व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या त्यांच्या सदस्यांसाठी विलगीकरण सेंटरची हॉटेल्स, हॉल येथे उभारणी करणे,ऑक्सिजनची गरज भासल्यास त्वरित उपलब्ध करून देणे,कोरोना रुग्णांना हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध होण्यासाठी अंधेरी पश्चिम येथील बीएसईएस हॉस्पिटलचे कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर केले असून या वॉर्ड मधील 6 हॉस्पिटलमध्ये काही बेड कोरोना रुग्णांसाठी पालिकेने ताब्यात घेतले आहेत,ऑक्सिजन सिलेंडर सह रुग्णवाहिकांचे जाळे वाढवण्यात आले आहे अश्या अनेक उपक्रमाची के पश्चिम वॉर्डमध्ये यशस्वीपणे अंमल बजावणी करण्यात येत असल्याची माहिती विश्वास मोटे यांनी दिली.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई