मुंबई : कठीण प्रसंगात अनेकदा स्वसंरक्षणासाठी महिलांना त्यांच्याजवळील मिरचीची पूड किंवा तत्सम हत्याराचा वापर करण्याचे भान राहत नाही, म्हणूनच आत्मविश्वास हादेखील स्वसंरक्षणाचे प्रभावी माध्यम ठरू शकते, कारण त्यातून आपली देहबोली समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल दरारा निर्माण करू शकते, त्याचबरोबर आपण शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहिले पाहिजे, असे विचार शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक गुलाब पाटील यांनी व्यक्त केले.स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने मुली व महिलांसाठी खास नि:शुल्क स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या शिबिरात महिलांचा सहभाग विशेष आहे. पाटील यांनी या वेळी काही प्रात्यक्षिक व प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोरे, एस. के. पाडवी, आर. एन. पवार, एस. एस. कहाडळ तसेच स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, प्रशिक्षक राजेश खिलारी, राजन जोथाडी, अनिल पाटील, अधीक्षक संजय चेंदवणकर आदी मान्यवर उपस्थित होते. महिलांनी स्वसंरक्षणाबाबतच्या गोष्टींवर चर्चा केली तर निश्चितपणे त्यांना त्यातून मार्गदर्शन मिळू शकते, पोलिसांकडे जाण्याबाबत अजिबात कचरू नये, १०० क्रमांकावर तक्रार दिल्यास तत्काळ वायरलेसवरून संदेश जाऊन काही मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचू शकतात, अशी आता परिस्थिती झाली आहे. काही गोष्टी बोलता येत नसतील किंवा सांगणे अवघड होत असेल तर ठिकठिकाणी ठेवलेल्या तक्रारपेट्यांत त्या लिहून पाठवाव्यात, पोलीस निश्चितपणे कारवाई करतात, अशा अनेक बाबी पाटील यांनी या वेळी सांगितल्या. महिलांना समाजात मोकळेपणाने वावरता यावे, त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा, स्वसंरक्षणाअभावी त्यांची कार्यक्षमता वाया जाऊ नये, यासाठी अशा प्रकारचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यापुढील काळातदेखील अशा उपक्रमांना निश्चितपणे प्राधान्य दिले जाईल, असे विचार स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
आत्मविश्वास संरक्षणाचे प्रभावी माध्यम- पाटील
By admin | Updated: April 12, 2017 03:00 IST