Join us

प्रभावी महिला उमेदवारांचा शोध

By admin | Updated: October 16, 2016 03:22 IST

आरक्षणात ५० टक्के भागीदारी मिळाल्याने महापालिकेत महिलाराज आले. महिलांच्या हातात सत्ता आल्याने मुंबईच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा होती

- शेफाली परब-पंडित,  मुंबई

आरक्षणात ५० टक्के भागीदारी मिळाल्याने महापालिकेत महिलाराज आले. महिलांच्या हातात सत्ता आल्याने मुंबईच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र यापैकी निम्म्या जणी आरक्षणात हद्दपार झालेल्या पती, पिता व भावाची राजकीय कारकीर्द वाचविण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या. त्यामुळे गेली पाच वर्षे चार-पाच जणी वगळता कोणत्याच पक्षातील महिला नगरसेवकाचा प्रभाव दिसून आला नाही. त्यात आरक्षण आणि फेररचनेत आणखी काही दिग्गज बाद झाल्याने सर्वच पक्षांची आता महिलांवरच मदार आहे. यासाठी सर्वच पक्षांत अशा वजनदार महिला उमेदवारांचा शोध सुरू आहे.२०१२ च्या महापालिका निवडणुकीत आरक्षणाव्यतिरिक्त खुल्या प्रवर्गातही महिलांना उमेदवारी मिळाल्यामुळे १२२ नगरसेविका निवडून आल्या, मात्र आरक्षणात बाद अनेक दिग्गजांच्या दबावामुळे त्या-त्या राजकीय पक्षाने शिफारस केलेल्या महिलांना उमेदवारी दिली. परिणामी या महिला नगरसेवक कळसुत्री बाहुल्याच ठरल्या. महापौर, उपमहापौर, गटनेतेपद, विविध समित्यांचे अध्यक्षपदही महिलांकडेच गेले. मात्र, त्यांची छाप पालिकेच्या कामकाजात दिसून आली नाही. यामुळे पक्षाचे नुकसान झाल्याने असले ‘डमी’ कोणत्याच पक्षाला नकोच आहेत.अभ्यासू आणि आक्रमक महिला उमेदवारांचा शोध शिवसेना व काँग्रेस या मोठ्या पक्षांनी सुरू केली आहे. यामध्ये शिवसेनेच्या विभागप्रमुख व आक्रमक माजी नगरसेविका राजुल पटेल यांचे नाव आघाडीवर आहे. मनसेत स्नेहल जाधव यांना संधी आहे. काँग्रेसमध्ये अशा महिला कार्यकर्त्यांची कमतरता आहे. त्यामुळे त्यांना बाहेरील महिलांना उमेदवारी द्यावी लागणार आहे. तळागाळात कार्यरत शिवसेना, मनसे आणि भाजपामधील महिला कार्यकर्त्यांना यामुळे अखेर संधी चालून आली आहे.

एकूण प्रभाग २२७ 

महिलांसाठी आरक्षित ११४ 

- अनुसूचित जातीसाठी १५, जमातीसाठी दोन, इतर मागासवर्गासाठी ६१ तर महिलांसाठी राखीव असलेल्या ७४ अशा एकूण १५२ प्रभाग राखीव आहात. - २०१२ मध्ये शिवसेनेचे ७५ नगरसेवक जिंकून आले. यात ५८ टक्के महिलांना उमेदवारी मिळाली होती. ४४ महिला निवडून आल्या - ५१ जागांवर काँग्रेसचा विजय - ४४ टक्के महिलांना उमेदवारी - २८ महिला निवडून आल्या - ३१ जागांवर भाजपाचा विजय - ४९ टक्के महिलांना उमेदवारी - १६ महिला निवडून आल्या - २८ जागांवर मनसेचा विजय - ४९ टक्के महिलांना उमेदवारी - १३ महिला निवडून आल्या महिला आरक्षण या वॉर्डमध्ये सर्वाधिक वॉर्ड-एकूण-आरक्षित बी- २ -२ डी -६ -४ एफ दक्षिण- ७ -४ जी उत्तर-११ -६ के पश्चिम-१३ -९ पी दक्षिण-९ -५ पी उत्तर-१९-११ आर दक्षिण-१३-८ एन-११ -६ एम पूर्व-१५ -११ एस- १४ -११