Join us

शिक्षण मातृभाषेतच झाले पाहिजे -भालचंद्र नेमाडे

By admin | Updated: February 15, 2015 01:06 IST

पालकांच्या इंग्रजी प्रेमापोटी असणाऱ्या अंधश्रध्देमुळे विद्यार्थ्यांना ज्या पुस्तकांतून शिकवले जाते, ती पुस्तके चुकीच्या लोकांनी लिहिली आहेत.

मुंबई : पालकांच्या इंग्रजी प्रेमापोटी असणाऱ्या अंधश्रध्देमुळे विद्यार्थ्यांना ज्या पुस्तकांतून शिकवले जाते, ती पुस्तके चुकीच्या लोकांनी लिहिली आहेत. त्यामुळे मुलांना चुकीचा इतिहास शिकविला जात असल्याने शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांपलीकडे जाऊन संस्कृती, इतिहास मातृभाषेतून शिकवावा, असा सल्ला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी शनिवारी शिक्षकांना दिला.पाचवे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात शनिवारी पार पडले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन प्रख्यात अभिनेत्री, गायिका फैयाज यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्येष्ठ समीक्षक मधु पाटील यांच्याहस्ते भालचंद्र नेमाडे यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी संमेलनाध्यक्ष संभाजी भगत, शिक्षण विभागाचे सहसचिव प्रकाश ठुबे आदी मान्यवर उपस्थित होते.संस्कृती शिखरावर नाही, तळात घडते, गाळात उगवते. शिखरावर बर्फ, असतो आॅक्सिजन नसतो. लेखकापेक्षा मी शिक्षक असल्याचा मला जास्त अभिमान असल्याचे उद्गार यावेळी नेमाडे यांनी काढले. सध्या फक्त शिक्षकच नीट काम करतात. शिक्षकाची परंपरा उज्ज्वल असून, ही परंपरा त्यांनी टिकवून ठेवली पाहिजे. त्यांनी राजकारणात पडू नये, असा सल्लाही त्यांनी या वेळी उपस्थित शिक्षकांना दिला. या वेळी बोलताना प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी शिक्षण विभागासाठी स्वतंत्र खाते नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.