Join us  

१२ वैमानिकांना उड्डाण न करण्याची ठोठावली शिक्षा, डीजीसीएचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 5:21 AM

धावपट्टीवर अडकलेले स्पाइसजेटचे विमान हटवण्यात पाचव्या दिवशी यश

मुंबई : मुंबईविमानतळाच्या धावपट्टीवरून विमान घसरण्याच्या प्रकाराची नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) गंभीर दखल घेतली आहे़ स्पाइसजेटच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुरक्षा त्रुटीबाबत कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर त्या विमानाच्या वैमानिकासहित देशातील १२ वैमानिकांना पुढील आदेश येईपर्यंत विमान उड्डाण करण्यावर प्रतिबंध लादण्यात आले आहेत.मुख्य विमान सुरक्षा अधिकारी, मुख्य प्रशिक्षक, चीफ आॅफ आॅपरेशन सहित चार जणांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

स्पाइसजेटच्या कार्यालयात डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीमध्ये त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे, तसेच सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्यानेदेखील ही कारवाई झाली. स्पाइसजेटची ३, एअर इंडिया एक्स्प्रेसची २ व गो एअरचे एक विमान गेल्या काही दिवसांत धावपट्टीवरून घसरण्याचे प्रकार घडले होते. या ६ विमानांचे मुख्य वैमानिक व सहायक वैमानिक अशा १२ वैमानिकांना पुढील आदेशापर्यंत उड्डाण करू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांना ‘ग्राउंडेड’ करण्यात आले आहे. १ जुलै रोजी मुंबईत स्पाइसजेटचे विमान धावपट्टीवरून घसरले होते. त्यामुळे तब्बल ८८ तास मुख्य धावपट्टी बंद करावी लागली होती. हवाई वाहतूक व देशातील हवाई वाहतूक विस्कळीत झाली होती. ३० जून रोजी स्पाइसजेटचे विमान सूरत विमानतळावर धावपट्टीवरून घसरले होते़धावपट्टीवर अडकलेले स्पाइसजेटचे विमान हटवण्यात पाचव्या दिवशी यशसोमवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवरून घसरलेले स्पाइसजेटचे विमान हटवण्यात तब्बल पाचव्या दिवशी यश आले. यामुळे सुमारे ८८ तास बंद असलेल्या या धावपट्टीचा शुक्रवारी सायंकाळपासून वापर करण्यास प्रारंभ झाला. हे विमान दुपारी ३.४१ वाजता धावपट्टीवरून बाजूला हटवण्यात आले़ त्यानंतर ४.४७ वाजता मुख्य धावपट्टी सुरू करण्यात आली. सोमवारपासून मुख्य धावपट्टीचा वापर बंद असल्याने पर्यायी धावपट्टी वापरली जात होती़ पर्यायी धावपट्टी मुख्य धावपट्टीच्या तुलनेत लहान असल्याने अनेक विमानांचे उड्डाण रद्द करावे लागले होते; तर अनेक विमानांचा मार्ग बदलून त्यांना इतर विमानतळांवर वळवावे लागले होते. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या एअरसाइड आॅपरेशन, देखरेख, प्रकल्प व अग्निशमन दलाच्या ६० सदस्यीय गटासोबत एआयसीच्या १०० कर्मचा-यांची चमू गेले पाच दिवस तब्बल ८८ तास सलगपणे हे काम करीत होती. भर पावसातदेखील हे काम सुरू होते. धावपट्टीवरून घसरलेल्या व चाके चिखलात रुतलेल्या या विमानाला बाहेर काढण्यासाठी सुरुवातीला मार्ग तयार करण्यात आला व विमानाला मागे ढकलण्यात आले. विमानाला धावपट्टीवरून हटवून ‘पार्किंग बे’मध्ये नेण्यात आले. एअर इंडियाच्या इंजिनीअरिंग टीमने डिसेबल्ड एअरक्राफ्ट रिकव्हरी किट (डीएआरके)च्या साहाय्याने विमानाला बाहेर काढले. या परिसरात चिखल असल्याने पोकलेन मशीन त्यावर राहण्यासाठी व विमानाला बाहेर काढण्यासाठी दगडांची रास मांडण्यात आली व त्यावर स्टील प्लेट्स व एफआरपी शिट ठेवण्यात आल्या होत्या. विमानातील सर्व सामान व इंधन काढल्यानंतर सुमारे ४१ टन वजनाचे हे विमान हटविण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली होती. नोझ गिअरमध्ये बिघाड झाल्याने नोझ गिअर उपलब्ध नसल्याने विमानाला मागे ढकलणे अत्यंत जिकिरीचे होते; मात्र तरीही हे काम करण्यात कर्मचाºयांना यश मिळाल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली. हे सर्व करताना विमानाचे आणखी नुकसान होऊ नये याची काळजी घेतली गेली.

टॅग्स :विमानतळमुंबई