Join us
Daily Top 2Weekly Top 5

निर्देशांकात सुधारणेसाठी शिक्षण विभागाने केली तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 06:40 IST

महाराष्ट्रातील शालेय शिक्षण हे चौथ्या ग्रेडचे असल्याचे मनुष्यबळ विकास विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या निर्देशांकानुसार स्पष्ट झाले आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील शालेय शिक्षण हे चौथ्या ग्रेडचे असल्याचे मनुष्यबळ विकास विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या निर्देशांकानुसार स्पष्ट झाले आहे. राज्याच्या शिक्षण विभागाला १,००० गुणांपैकी सरासरी ६५१ ते ७००च्या दरम्यान गुण प्राप्त आहेत. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने १८ मार्च रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आता गव्हर्नन्स अँड मॅनेजमेंट या विभागात महाराष्ट्राची श्रेणी सुधारण्यासाठी मागील शैक्षणिक वर्षात प्राथमिक शाळांना दिलेल्या भेटींचा सविस्तर तपशील आणि साधारण शैक्षणिक दर्जाच्या शाळांना एकमेकांशी जोडणे या प्रमुख दर्शकांवर काम करण्याच्या सूचना राज्याच्या शिक्षण विभागाच्या सचिव वंदना कृष्णा यांनी दिल्या.निर्देशांकाच्या ७ निकषांपैकी शिक्षण विभागाच्या दर्जाच्या बाबतीत महाराष्ट्राला १८० पैकी १४४ गुण मिळविण्यात यश मिळाले आहे. पायाभूत आणि आवश्यक सुविधांमध्ये ११३ गुण मिळवत राज्य ९ व्या स्थानावर आहे. प्रशासकीय प्रक्रिया राबविण्यात ३५० पैकी केवळ १५५ गुण राज्याला प्राप्त झाले असून, ते २९व्या स्थानावर आहे. इक्विटीमध्ये राज्याला २०० पैकी २१२ गुण असून ते ८ व्या स्थानावर आहे.प्रशासकीय प्रक्रियांचा वेग आणि दर्जा सुधारण्यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या सूचना देण्यात आल्या आहेत. सूचनांप्रमाणे नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करून, अंमलबजावणी केल्यास पुढील काळात महाराष्ट्राचे मानांकन सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा वंदना कृष्णा यांनी व्यक्त केली.शिक्षण विभागाचा दर्जा, प्रवेश क्षमता, आवश्यक सुविधा आणि पायाभूत सुविधा, प्रशासन प्रक्रिया, इक्विटी या निकषांवर शिक्षण निर्देशांक सारांश अहवाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी - शिक्षकांची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंद झालेली उपस्थिती, राज्य व जिल्हा स्तरावर हजर शिक्षणाधिकारी, शिक्षकांची आॅनलाइन भरती व बदली, राज्याकडून शिक्षणावर खर्च झालेला निधी याचा विचारही पहिल्यांदाच यासाठी करण्यात आला आहे.