Join us

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सेतू अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:06 IST

आदिवासी विकास विभागाचा उपक्रम : नवीन शैक्षणिक वर्षात अभ्यासात खंड पडू न देण्यासाठी पुढाकारसीमा महांगडेलोकमत न्यूज नेटवर्क...

आदिवासी विकास विभागाचा उपक्रम : नवीन शैक्षणिक वर्षात अभ्यासात खंड पडू न देण्यासाठी पुढाकार

सीमा महांगडे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून शिक्षण सेतू अभियान राबविण्यात येणार आहे. कोरोनाकाळात शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे सेवाआभावी शैक्षणिक नुकसान होऊ नये हा त्यामागील मूळ उद्देश असणार आहे.

अभियान उत्तमरीतीने पार पाडण्यासाठी सर्वप्रथम यासाठी आवश्यक माहिती प्रणाली निर्माण करण्यात येणार आहे. यामध्ये विविध स्तरावर काम करण्यासाठी कार्यकारी समिती, सनियंत्रण समिती, अंमलबजावणी आणि मानांकन समिती यांचा समावेश असणार आहे. या प्रत्येक समितीची रचना, कार्यपद्धती वेगवेगळी असणार असून, त्यांनी नेमून दिलेली कामांची योग्य अंमलबाजवणी करणे अपेक्षित असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होईपर्यंतच्या कालावधीसाठी हे अभियान राबविण्यात येणार असल्याने १५ जून ते १५ ऑगस्टपर्यंत हे अभियान सुरू राहील असा प्राथमिक अंदाज आहे; मात्र प्रकल्पनिहाय त्यात फेरबदल करण्याचा अधिकार कार्यकारी समितीला असणार आहे.

शिक्षण मित्र साधणार दुवा

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याकरिता ठरावीक कालांतराने शिक्षण मित्रांमार्फत पालक संस्थेला ते पोहोचविण्यात येणार आहे. यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची मदत घेतली जाणार आहे. तसेच गावातील चावडी, ग्रामपंचायतीतील उपलब्ध जागा, शाळेतील उपलब्ध जागा येथे शासनाच्या कोविड नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांकडून स्वाध्याय पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ही शिक्षण मित्रांची असणार आहे. गुगल क्लासरूम, व्हाॅट्सॲप, टेलिग्राम, प्रत्यक्ष भेट यातील एक पर्याय निवडून त्यांना हे स्वाध्याय पुन्हा नियंत्रण कक्षाकडे परत करण्याचेही काम हाती घ्यावे लागणार आहे. या अभियान आणि त्यातील शिक्षण मित्र साधणार असलेल्या दुव्यामुळे आदिवासी भागातील विद्यार्थीही शिक्षण प्रवाहात कायम राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.