Join us

ईडीची चौकशी निःपक्षपाती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:07 IST

अनिल देशमुख यांचा आरोप : तिसऱ्या समन्सला दिले उत्तरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हप्ता वसुलीच्या आरोपप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ...

अनिल देशमुख यांचा आरोप : तिसऱ्या समन्सला दिले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : हप्ता वसुलीच्या आरोपप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बजाविलेल्या तिसऱ्या समन्सनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीला हजर राहणे टाळले आहे. इतकेच नव्हे तर नोटिशीला उत्तर देताना आपल्याला जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवले जात असून, ईडीचा तपास निःपक्षपाती व पारदर्शीपणे नसल्याचा आरोप केला आहे.

ईडीने देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांनाही मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजाविले आहे. ते चौकशीला हजर राहतात, की येणे टाळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

ईडीकडून कठोर कारवाई होऊ नये, यासाठी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे ते सोमवारी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे जवळपास स्पष्ट होते. त्यानुसार तिसऱ्यांदा गैरहजर राहत तपास पद्धतीवर आक्षेप घेतला आहे. ईडीचे सहायक संचालक तसिन सुलतान यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, आपल्याबद्दलचा तपास निःपक्षपातीपणे केला जात नसल्याची भीती माझ्या मनात आहे, त्यामुळे मी त्याविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागितली आहे.

परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत सीबीआयने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्राथमिक तपास करून अहवाल सादर केला होता. त्याच्या आधारावर ईडीने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्यांच्या घरी छापे टाकून खासगी सचिव संजीव पालांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना अटक केली आहे.