Join us

पालांडे, शिंदे यांनी ४.८० कोटी घेतल्याचा ईडीला संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:05 IST

वाझे, बारमालकांच्या जबाबातून उघड; हप्ता वसुलीची रक्कम हवालामार्फत परदेशात ?जमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कारमायकल ...

वाझे, बारमालकांच्या जबाबातून उघड; हप्ता वसुलीची रक्कम हवालामार्फत परदेशात ?

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कारमायकल स्फोटक कार प्रकरणापूर्वीच्या तीन महिन्यांत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचे विश्वासू सहकारी व खासगी सचिव संजीव पालांडे व सहायक कुंदन शिंदे यांनी ४ कोटी ८० लाख रुपये हप्त्याच्या स्वरूपात मिळविले होते. तत्कालीन एपीआय सचिन वाझे याने ही रक्कम मुंबईतील बार मालकांकडून वसूल करून त्यांना दिल्याचा सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) संशय आहे. देशमुख यांच्या सूचनेनुसार हवालामार्फत ती रक्कम दिल्ली व तेथून परदेशात पाठविण्यात आली. दोघांना कोठडी मिळाल्याने त्याबाबत त्यांच्याकडे सविस्तर उलगडा केला जाईल, तर देशमुख यांच्याकडेही लवकरच चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या महिन्याला १०० कोटी हप्ता वसुलीच्या टार्गेटच्या आरोपाच्या अनुषंगाने ईडीला आतापर्यंतच्या चौकशीतून या रकमेच्या अनुषंगाने कसलीही माहिती मिळालेली नाही. शिवाय बँक व्यवहार अथवा हवाल्याद्वारे रक्कम जमा झाल्याचे समोर आलेले नाही. मात्र, या प्रकरणातील मुख्य साक्षीदार सचिन वाझे, बारमालक जया शेट्टी व महेश शेट्टी यांच्या जबाबानुसार ३ महिन्यांत ४ कोटी ८० लाख रुपये पालांडे व शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आल्याचे समोर आले आहे. ही रक्कम डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत मुंबई शहर व उपनगरातील ६० बारमालकांकडून वसूल करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाझेचा तळोजा जेलमध्ये जाऊन जबाब नोंदविला होता. त्यातून आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे समोर आल्याचे त्यांनी ईडीला कळविले होते. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली होती. त्यामध्ये जमा केलेली रक्कम पहिल्यांदा मुंबईतून नागपूरला पाठविली जायची. तेथून दिल्लीला एका ट्रस्टच्या नावे जमा केली जायची. हवाल्यामार्फत हा व्यवहार होत असे, शिंदे सदस्य असलेल्या एका ट्रस्टमधूनही रक्कम काढून परदेशात वर्ग केली जात हाेती, असा संशय अधिकाऱ्यांना आहे.

त्यासाठी देशमुख यांचे पुत्र सलील व ऋषिकेश देशमुख आणि त्याचे निकटवर्तीय विक्रम शर्मा यांच्या नावे असलेल्या विविध कंपन्यांच्या खात्यांचा वापर करण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.

कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांनी आर्थिक गैरव्यवहाराबद्दल अद्याप कबुली दिलेली नाही. मात्र, आर्थिक व्यवहार झाल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आणखी अनेक लोकांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे ईडीने सखोल चौकशीसाठी दोघांची कस्टडी घेतली आहे. त्यांच्याबरोबरच अनिल देशमुख आणि त्यांच्या पुत्रांना लवकरच चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

* बनावट कंपन्यांच्या खात्यावर निधी!

हप्ता वसुलीतून मिळत असलेली रक्कम ही देशमुख यांचे पुत्र व निकटवर्तीयांच्या नावे असलेल्या विविध कंपन्यांच्या खात्यावर वर्ग केली असल्याचा ईडीला संशय आहे. सुमारे २४ कंपन्यांपैकी १५ हून अधिक कंपन्या केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे समजते. हवल्यामार्फत या कंपन्यांना बँक खात्यात रक्कम जमा करून पाठविली जात असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे.

----------------------