Join us

अनिल देसाई यांच्या नीकटवर्तीयाला ईडीचे समन्स- मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल

By मनोज गडनीस | Updated: March 26, 2024 18:41 IST

सीबीआने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारेच ईडीने हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, २०१३ ते २०२३ या कालावधीमध्ये दिनेश बोभाटे हे एका विमा वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत होते.

मनोज गडनीस

मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार अनिल देसाई यांचा नीकटवर्तीय दिनेश बोभाटे यांच्याविरोधात ईडीने (सक्तवसुली संचालनालय) फेब्रुवारी महिन्यात मनी लॉड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आता या आठवड्यात चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी केल्याची माहिती आहे. जानेवारी महिन्यात बोभाटे यांच्या विरोधात सीबीआयने देखील भ्रष्टाचाराचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला होता.

सीबीआने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारेच ईडीने हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, २०१३ ते २०२३ या कालावधीमध्ये दिनेश बोभाटे हे एका विमा वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत होते. त्या कालावधीमध्ये विमा विषयात काम करताना त्यांनी पदाचा गैरवापर करत ज्ञात उत्पन्नापेक्षा ३६ टक्के अधिक संपत्ती गोळा केल्याचा आरोप सीबीआयने त्यांच्यावर ठेवला आहे. त्यांनी एकूण २ कोटी ६० लाखांची बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचा त्यांच्यावर आरोप असून या प्रकरणी त्यांच्यासह त्यांच्या पत्नीविरोधात देखील सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या पैशांच्या व्यवहारामध्ये मनी लॉड्रिंग देखील झाल्याचा संशय आल्यानंतर त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.