Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशमुख पिता-पुत्राला ईडीकडून पुन्हा समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील १०० कोटींच्या वसुली आरोपाच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने शुक्रवारी देशमुख ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील १०० कोटींच्या वसुली आरोपाच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने शुक्रवारी देशमुख यांच्यासह त्यांच्या मुलाला पुन्हा समन्स बजावला आहे. ईडीच्या कारवाईविरोधात केलेल्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलल्याने ईडीने ही कारवाई केली आहे. त्यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेकडे १०० कोटींची मागणी केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील बार, हॉटेल, रेस्टॉरंट मालकांकडून वसुली करण्याचा मार्ग देशमुखांनी सचिन वाझेला सांगितल्याचे सिंह यांनी पत्रात म्हटले होते.

या पत्रामुळे देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पुढे सीबीआयने देशमुखांवर झालेल्या आरोपांची चौकशी करत गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात ईडीकडून तपास सुरू आहे. तपास करत असताना ईडीने देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरे तसेच कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. त्याचबरोबर देशमुख यांचे दोन सचिव कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक केली. दोघेही ईडीच्या कोठडीत आहेत. तसेच देशमुख यांनादेखील ३ वेळा समन्स बजावले, मात्र ते हजर झाले नाहीत.

ईडीने बजावलेल्या तिसऱ्या समन्सनंतर देशमुख नॉट रिचेबल झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. ईडीकडून देशमुखांना अटक केली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. ईडीने देशमुखांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती जप्त केली आहे.

देशमुख यांनी चौकशीला हजर न राहता ईडीच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने देशमुख यांना दिलासा न देता यावरील सुनावणी ३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यानंतर ईडीने शुक्रवारी अनिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे देशमुख पिता-पुत्र हजर राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.