Join us  

किशोरी पेडणेकर यांची पुन्हा ईडी चौकशी, २५ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 8:47 AM

यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी किशोरी पेडणेकर यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी सहा तास चौकशी केली होती. 

मुंबई : कोरोनाकाळात मुंबई महापालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्जमध्ये झालेल्या कथित घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना २५ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी किशोरी पेडणेकर यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी सहा तास चौकशी केली होती. 

कोरोना काळामध्ये खरेदी झालेल्या बॉडी बॅग्ज या एका खासगी कंपनीकडून महापालिकेने तिप्पट दराने खरेदी केल्याचा आरोप करत या प्रकरणी ४ ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्याच्या आधारे ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. संबंधित खासगी कंपनीने मृतदेहासाठी तयार करण्यात आलेली बॉडी बॅग महापालिकेने ६७१९ रुपये दराने (प्रति बॅग दर) खरेदी केली होती.

तर हीच बॉडी बॅग त्याच कंपनीकडून राज्य सरकारच्या अन्य रुग्णालयांत तसेच खासगी रुग्णालयांत १५०० रुपये प्रति बॅग दराने खरेदी करण्यात आली. या प्रकरणात एकूण ४९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

टॅग्स :किशोरी पेडणेकर