Join us

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पत्नीची ‘ईडी’कडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:29 IST

परदेशी गुंतवणूक प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले ...

परदेशी गुंतवणूक प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पत्नी गौरी भोसले यांच्याकडे कसून चौकशी केली. परदेशातील मालमत्ता खरेदीबाबतच्या कथित व्यवहाराबाबत त्यांचा जबाब नोंदवून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

गौरी भोसले या काँग्रेसचे नेते व राज्यातील महाविकास आघाडीतील राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या सासू आहेत. अविनाश भोसले यांच्या कथित अवैध मालमत्तेच्या संदर्भात ‘ईडी’ने नोव्हेंबरमध्ये त्यांच्या पुणे, मुंबईतील निवासस्थाने, कार्यालय, आदी २८ ठिकाणी छापे टाकले होते. परदेशी विनिमय व्यवस्थापन अधिनियम (फेमा)अंतर्गत जुन्या खटल्याच्या संदर्भात अविनाश भोसले यांची २७ नोव्हेंबरला अनेक तास कसून चौकशी केली. याबाबत त्यांची पत्नी गौरी यांनाही नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र त्या यापूर्वी कार्यालयात हजर राहिल्या नव्हत्या.

मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास त्या बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात आल्या. अधिकाऱ्यांनी परदेशातील त्यांची बँक व्यवहार, गुंतवणुकीबाबत विचारणा करण्यात आली. त्यांचा सविस्तर जबाब नोंदवून घेण्यात आला. आवश्यकता वाटल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बाेलावण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अविनाश भोसले यांची कन्या व राज्यमंत्री कदम यांच्या पत्नी स्वप्नाली भोसले-कदम यांनाही नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांचाही या प्रकरणी जबाब नोंदवून घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

...................