टीआरपी घोटाळा : माफीच्या साक्षीदाराची उच्च न्यायालयात धाव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांना दिलेला जबाब बदलण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप करत या घोटाळ्यातील आरोपी व माफीचा साक्षीदार उमेश मिश्रा याने उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली. या घोटाळ्याचा तपास मुंबई पोलीस करत असले तरी ईडीनेही मनीलॉड्रिंगअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी केलेल्या याचिकेत मिश्रा यांनी मध्यस्थी याचिका दाखल केली. कोणताही आदेश देण्यापूर्वी आपल्या याचिकेवर सुनावणी घ्यावी, अशी विनंती मिश्रा यांनी न्यायालयाकडे केली.
टीआरपीवर लक्ष ठेवणाऱ्या हंसा रिसर्च एजन्सीचा कर्मचारी मिश्रा याला विरारमधून ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आली. काही ठरावीक वृत्तवाहिन्या पाहण्यासाठी काही लोकांना पैसे दिल्याचा आरोप मिश्रावर आहे. टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मिश्राने सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत दंडाधिकारी यांच्यापुढे जबाब नोंदविला. तो माफीचा साक्षीदारही आहे.
१८ डिसेंबर रोजी ईडीने मिश्राला समन्स बजावले. त्याच दिवशी तो ईडीच्या कार्यालयात गेला. त्याच्या म्हणण्यानुसार, ईडीने जबरदस्तीने त्याला दंडाधिकाऱ्यांपुढे दिलेल्या जबाबाशी विसंगत जबाब देण्यास भाग पाडले. खरा व योग्य जबाब ईडीने नोंदविला नसल्याचे त्याने याचिकेत म्हटले आहे.
या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर होती. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १२ फेब्रुवारी रोजी ठेवली.