ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - रोजगार क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने तसेच कौशल्यामधली दरी साधण्यासाठी, झपाट्याने वाढणाऱ्या ईकॉर्मसच्या बाजारपेठेचा लाभ करून घेण्यासाठी उद्योजकांसाठी नवनवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने ईबे इंडिया आणि जागतिक कौशल्य विकास कंपनी असणाऱ्या एनआयआयटीने गुरूवारी पहिल्यावहिल्या ईकॉमर्स सर्टिफिकेशन प्रोग्रॅम, ईप्रोची घोषणा केली.
सार्वजनिक तसंच खासगी संस्थाच्या भागीदारीतून तरुणांमधल्या कौशल्यवाढीसाठी शाश्वत तसेच सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी आणि त्याद्वारे रोजगार क्षमता वाढीस लागण्यासाठी ईप्रो सर्टिफिकेशन प्रोग्रॅमची रचना करण्यात आली अशी माहिती ईबे इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. लतीफ नाथानी यांनी दिली.
ईबे इंडियाने आत्तापर्यंत ५०,००० हून अधिक व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय सुरू करण्यास मदत केली आहे. ईबे इंडिया ऑनलाइन बिझनेस इंडेक्सच्या मते, स्थानिक ऑनलाइन उद्योजक सरासरी ४.८ पूर्ववेळ कर्मचारी आणि १.६ अर्धवेळ कर्मचारी नेमतो. हे प्रमाण वाढून ५.२ पूर्ववेळ कर्मचारी आणि २.१ अर्धवेळ कर्मचारी इतकं वाढवण्याचा प्रयत्न आहे. ही दरी भरून काढण्याचे कामही ईप्रो सर्टिफिकेशन करेल असे नाथानी म्हणाले.